प्रादेशिक पक्ष संपवायचेच असते, तर शिवसेनेचे अनंत गीते यांना बोलावून घेऊन राजीनामा द्यायला सांगितला असता. आम्हाला युती टिकवायची होती, असे सांगतानाच भाषा संयमित असायला हवी, याची दक्षता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घ्यावी, असा सल्ला केंद्रीय सिंचन मंत्री उमा भारती यांनी दिला. येथे त्या पत्रकार बैठकीत बोलत होत्या.
टोकदार भावनांवर नियंत्रण मिळवता आले पाहिजे, आम्ही ते मिळवतो. महाराष्ट्रात येत असू, तेव्हा बाळासाहेबांना भेटत असू. या नात्याने उद्धव हे मला सख्ख्या भावासारखे आहेत. त्यामुळे पूर्वी कोणी तरी चांगले होते आणि दूर झाले की वाईट, असे म्हणणे योग्य होणार नाही, असे सांगत उमा भारती यांनी सेनेला संयमी भाषा वापरण्याचा सल्ला दिला. भ्रष्टाचाराचे आरोप असणारे उमेदवार भाजपत  आल्यानंतर संत होतात काय, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्यावर उमा भारती हसत म्हणाल्या, ‘गंगेत मिळाले, पवित्र झाले!’ या प्रश्नावर अधिक भाष्य त्यांनी केले नाही. स्थानिक पातळीवरचे राजकारण उमा भारतींना माहीत नाही, अशी सारवासारव या वेळी करण्यात आली.
महाराष्ट्रातील अर्धवट सिंचन प्रकल्पासाठी नियमांमध्ये बदल करावे लागतील. केंद्रीय मंत्रिमंडळासमोर जावे लागले तरी चालेल. मात्र, राज्यातील बहुतांश अर्धवट प्रकल्पांना तंत्रज्ञानाची जोड देऊन ते अधिक लवकर पूर्ण करण्यास प्रयत्न केले जातील, असेही भारती यांनी सांगितले. गोसी खुर्दसारखा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला. असे अनेक प्रकल्प पूर्ण व्हावेत, म्हणून येत्या ६ ते ७ महिन्यांत विशेष पॅकेज करण्याची मानसिकता असल्याचेही त्या म्हणाल्या.
राममंदिराचा प्रश्न भाजपने आता सोडून दिला आहे का, असे विचारले असता अयोध्येतील ‘त्या’ जागेवर तीन मूर्तीपैकी एक श्रीरामाची असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. आमचे आंदोलन अयोध्येत तेथे राम जन्मले की नाही, या अनुषंगाने होते. त्यात आम्हाला न्याय मिळाला. आता प्रश्न तेथील जागेबाबत आहे. जागेचा निर्णय न्यायालयाकडून होत नाही, तोपर्यंत त्यापुढे काही होणार नाही. जागा कोणाच्या मालकीची, असा न्यायालयात वाद चालू असून त्यावर बोलणे अप्रस्तुत ठरेल, असेही भारती म्हणाल्या.