मुंबई : ग्रामीण महिलांना केवळ बचत गटांच्या चौकटीत न ठेवता शेती, व्यवसाय आणि उद्योजकतेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून व्यापक प्रयत्न सुरू आहेत. आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषी साहित्य उपलब्धता आणि विविध व्यवसायांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून दिले जात आहे. उमेद अभियानातून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला नवी दिशा मिळत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
‘उमेद’ अभियानांतर्गत कृषी अवजार बँक आणि कृषी पूरक इतर साहित्य केंद्र हे महत्त्वाचे उपक्रम राबविले जात आहेत. वर्ष २०२४-२५ आणि २०२५-२६ या कालावधीत राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३५१ तालुक्यांमध्ये ४०८ कृषी अवजार बँका स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याचा सुमारे ४० हजार ८०० महिला शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. या बँकांमध्ये ट्रॅक्टरसह विविध कृषी अवजारे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिली जात असल्याने अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांचा भांडवली खर्च कमी होत आहे. पेरणी, आंतरमशागत आणि कापणीची कामे वेळेत पूर्ण होण्यासही मदत होत आहे.
कृषी पूरक साहित्यांच्या क्षेत्रात ५४ महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांना बियाणे व खत विक्रीचे परवाने मिळाले आहेत. त्यातून सुमारे ५४ हजार महिला सभासदांना सेवा दिली जात आहे. सामूहिक खरेदीमुळे दर्जेदार साहित्य योग्य दरात उपलब्ध होण्यास मदत होत आहे. कृषी क्षेत्राबरोबरच महिलांकडून रेशन दुकाने, सिमेंट एजन्सी, वीट निर्मिती, केरोसीन एजन्सी आणि टाईल्स निर्मिती यांसारखे व्यवसायही चालविले जात आहेत. ३२ स्वयं-सहाय्यता समूहांमधील ५८ महिला रेशन दुकाने, तर २४ महिला वीट निर्मिती व्यवसायात कार्यरत आहेत.
बचत आणि कर्जाच्या चौकटीपलीकडे जाऊन महिलांचा उद्योजकतेकडे होत असलेला प्रवास ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा ठरत आहे. व्यवसाय व्यवस्थापन, वित्तीय समावेशन आणि बाजारपेठेशी जोडणीच्या माध्यमातून महिलांची निर्णयक्षमता व आर्थिक स्वावलंबन वाढत आहे. असे फडणवीस यांनी सांगितले.
