अमरावती शहरातील मेडिकल व्यावसायिक उमेश प्रल्हादराव कोल्हे यांची २१ जून रोजी रात्री हत्या झाली होती. मृतक कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने त्यांची हत्या झाली, असा आरोप भाजपाने केला आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपा नेते व खासदार अनिल बोंडे आणि भाजपाचे राज्य प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय यांनी केली होती.

यानंतर गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) पथक व ATS अमरावती शहरात दाखल झाले असून ते या प्रकरणाशी संबंधित स्थानिक पोलिसांकडून माहिती घेत आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी यापूर्वीच ५ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. यानंतर आता पोलिसांनी सहाव्या आरोपीला देखील अटक केल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक पोस्ट शेअर केली होती. दरम्यान त्यांनी संबंधित पोस्ट एका मुस्लीम ग्रुपवर देखील शेअर केली. याच कारणातून त्यांची हत्या झाली असावी, असा संशय तपास यंत्रणांना आहे. अटक केलेल्या एका आरोपीनं आपल्या जबाबात म्हटलं की, “कोल्हे यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत अवमानकारण पोस्ट केली आहे. त्यामुळे त्यांनी मरायलाच हवं.” या जबाबामुळे संशय अधिक बळावला असून गृहमंत्रालयाने एनआयएला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

सोशल मीडिया पोस्टमुळे ही हत्या झाली आहे का, असे विचारले असता मृत कोल्हे यांचा मुलगा संकेत याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “माझे वडील खूप सामान्य स्वभावाचे व्यक्ती होते. ते कधीही कोणाबद्दल वाईट बोलले नाहीत किंवा ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे त्यांची हत्या झाल्याचं मी ऐकलं, त्यानंतर मी त्यांचं फेसबूक प्रोफाइल तपासले आणि त्यात काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. त्यामुळे हत्येचं नेमकं कारण पोलीसच सांगू शकतील. पण मी खात्रीने एवढं सांगू शकतो की त्यांची हत्या दरोड्याच्या उद्देशाने झालेली नाही.”