अमरावती : येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी शनिवारी रात्री नागपुरातून अटक करण्यात आलेला आरोपी इरफान खान (३५) हा ‘मास्टरमाईंड’ असल्याचे सांगितले जात आहे. इरफान खान हा ‘रहबर’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेचा संचालक आहे. पोलिसांनी आता या संस्थेच्या बँक व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे.

आतापर्यंतच्या तपासात उदयपूर आणि अमरावतीमधील हत्यांमध्ये समानता दिसून आली आहे. उदयपूर येथील शिंप्याप्रमाणेच, नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या समाज माध्यमांवरील संदेशांसाठी कोल्हे यांना लक्ष्य केले गेले असल्याचा संशय आहे. शनिवारी या हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्यात आला.

गेल्या २१ जून रोजी उमेश प्रल्हादराव कोल्हे या ५४ वर्षीय औषधी व्यावसायिकाची हत्या करण्यात आली होती. यापूर्वी पाच जणांना अटक करण्यात आली होती, तर पोलिसांनी शनिवारी आणखी दोन संशयितांच्या अटकेची पुष्टी केली. इरफान खान याला शनिवारी रात्री नागपुरातून तर पशुवैद्यकीय डॉक्टर असलेल्या युसूफ खान (४४) याला शुक्रवारी रात्री ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी सांगितले की, याआधी अटक केलेल्या पाचपैकी किमान चार जण इरफानचे मित्र होते आणि त्यांनी त्याच्या ‘एनजीओ’सोबत स्वयंसेवा केली होती. इरफानवर हत्येची योजना आखल्याचा, संशयितांना विशिष्ट कामे सोपवल्याचा आणि वाहन तसेच रोख रक्कम यांसारखी रसद पुरवल्याचा आरोप आहे.

युसूफ खान या पशुवैद्यकीय डॉक्टरने इतरांना भडकाविल्याचा आरोप आहे. कोल्हे यांनी समाज माध्यमांवर संदेश प्रसारीत केले, त्यामुळे युसूफने इतरांना भडकावले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.