scorecardresearch

शेतजमिनीसाठी काकाने गाठली क्रूरता, थेट चिमुकल्या पुतणीला नदीत फेकलं; सोलापुरातील घटना

आईच्या नावावर असलेली जमीन वाटणी न करण्यात तुम्ही पती-पत्नी जबाबदार असून…

uncle throw brother child in river mohol
शेतजमिनीसाठी काकाने गाठली क्रूरता, थेट चिमुकल्या पुतणीला नदीत फेकलं; सोलापुरातील घटना

सोलापुरातील मोहोळ तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतजमीन नावावर करून देण्यासाठी भावांमध्ये वाद झाला. या वादातून काकाने चार वर्षीय पुतणीला नदीत फेकून दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानदा यशोधन धावणे ( ४ वर्षे ) असं मृत चिमुकलीचं नाव आहे. तर, यशोदीप धावणे असं आरोपी काकाचं नाव आहे. ही घटना मोहोळ तालुक्यातील डिकसळ येथे घडली आहे. यशोधन शिवाजी धावणे यांची वडिलोपार्जित १६ एकर शेतजमीन आहे. यातील पाच एकर यशोधन धावणे यांच्या नावावर, पाच एकर यशोदीप धावणे आणि उर्वरित सहा एकर आईच्या नावाने आहे.

पण, आईच्या नावावर असलेली सहा एकर असलेली शेतजमीन ही आपल्या नावावर करुण देण्यासाठी यशोदीप हा सतत भांडण करत होता. मात्र, याच कारणावरून सोमवारी ( २० फेब्रुवारी ) यशोदीप आणि यशोधन या दोन्ही भावात पुन्हा एकदा भांडण झाले. आईच्या नावावर असलेली ६ एकर जमीन वाटणी न करण्यात तुम्ही पती-पत्नी जबाबदार असून, आज तुमचा फैसलाच करतो असे म्हणत यशोदीप याने यशोधनला शिवीगाळ केली. तसेच, तुमचा वंश संपवतो अशी धमकी दिली.

हेही वाचा : “शिवसेना पक्ष निधीचे सर्व पैसे…”, दीपक केसरकरांचं विधान; व्हीपबाबतही केलं भाष्य

गावातील लोकांनी मध्यस्थी करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मृत ज्ञानदाचे वडील यशोधन हे आई आणि पत्नीसह शेताला गेले. काही कामानिमित्त घरी परतल्यानंतर घरात मुलगी ज्ञानदा आणि वडील शिवाजी हे दोघे घरात दिसून आले नाही. त्यामुळं त्यांनी वडील शिवाजी यांना फोन केला असता मी मंदिरात दर्शनासाठी आलो आहे, ज्ञानदा ही घरात झोपलेली असल्याचे म्हटलं.

परंतु, ज्ञानदा घरात नसल्याने त्यांनी आसपास चौकशी केली असता, भाऊ यशोदीप याने ज्ञानदाला गाडीवर नेल्याचे काही जणांनी सांगितले. यावेळी भाऊ यशोदीपला फोन लावल्यानंतर मी तुझ्या मुलीला मलिकपेठ येथील सीना नदीच्या पात्रात फेकून दिल्याचं म्हटलं. यशोधन यांना हे ऐकल्यानंतर धक्का बसला. त्यांनी तात्काळ मालिकपेठला धाव घेतली. तिथे नदी पात्रात ज्ञानदा पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आल्याने स्थानिक नागरिकांनी तिला नदीतून काढले.

हेही वाचा : “तर संजय राऊत यांची राज्यसभेची खासदारकी रद्द करावी..”, दीपक केसरकर शिवसेनेच्या कार्यकारिणीत प्रस्ताव आणणार

ज्ञानदाला उपचारासाठी मोहोळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. पण, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. याप्रकरणी यशोदीप धाकणे विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 17:53 IST
ताज्या बातम्या