फेब्रुवारी २०२६ या महिन्यात नाशिक या ठिकाणी तिथल्या एका स्थानिक राजकीय कार्यकर्त्याने नाशिक शहर पोलिसांकडे एक तक्रार केली. त्यात त्याने असं म्हटलं होतं की टीसीएसच्या नाशिक बीपीओमध्ये काम करणारी २० वर्षीय हिंदू मुलगी रमझान महिन्याचे उपवास करते आहे. या तक्रारीनंतर घटनांची एक मालिका समोर आली. ज्यानंतर नऊ एफआयआर नोंदवण्या आले. लैंगिक शोषण, धर्मांतरण सात कर्मचाऱ्यांना अटक अशा सगळ्या घटना समोर आल्या. सोमवारी टाटा सन्सनचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांनी या प्रकरणी आम्ही सखोल चौकशी करत आहोत असं सांगितलं. नाशिकचं हे प्रकरण धक्कादायक आहे. हे प्रकरण नेमकं काय? ते कसं समोर आलं आपण जाणून घेऊ.

पोलिसांनी तक्रार मिळाल्यावर तरुणीच्या कुटुंबाशी संपर्क साधला

पोलिसांनी ज्या मुलीबाबत तक्रार मिळाली होती तिच्या कुटुंबाशी संपर्क साधला. आमची मुलगी रमजान मध्ये उपवास ठेवते आहे असं तिच्या पालकांनी सांगितलं. तसंच ती इस्लामच्या पद्धतीनेच वागते आहे असंही सांगितलं. तपास पथकातल्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर इंडियन एक्स्प्रेसला ही माहिती दिली. यानंतर पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आणि कंपनीत काय चाललंय याकडे लक्ष ठेवण्यासाठी एक योजना आखली.

पोलिसांची योजना नेमकी काय होती?

पोलिसांनी टीसीएसच्या या बीपीओमध्ये काही पोलीस कर्मचाऱ्यांना हाऊस किपिंग स्टाफ म्हणून नेमलं. त्याद्वारे टीसीएसमधल्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात झाली. दोन आठवड्यांनी आम्हाला आमच्या माणसांनी हे सांगितलं की अनेक गोष्टी या सुनियोजितपणे केल्या जात आहेत. कामावरुन सुटल्यानंतर ही माहिती आम्हाला आमचे कर्मचारी देत होते.आमच्या कर्मचाऱ्यांकडून आम्हाला पुरेशी माहिती मिळाली त्यानंतर आम्ही पुढील कारवाई करायला सुरुवात केली असं पोलिसांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.

सर्वात आधी दानिश शेखला अटक

ज्या मुलीबाबत पहिली तक्रार आली होती त्या मुलीच्या प्रकरणात आम्ही बलात्काराचा गुन्हा नोंदवला. ही मुलगी अटक करण्यात आलेल्या दानिश शेखवर प्रेम करत होती. दानिशने त्याचं लग्न आधीच झालं आहे ही बाब लपवली होती. लग्नाचं आश्वासन देऊन महिलेशी शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याने दानिशच्या विरोधात आम्ही बलात्काराचा गुन्हा नोंदवला असं पोलिसांनी सांगितलं. फेब्रुवारीत तक्रार दाखल झाली त्याच्या एक महिना आधी दानिशच्या पत्नीला या सगळ्या प्रकाराची कुणकुण लागली होती. कारण तिने सदर महिलेला मेसेज केला आणि नंतर फोनवर बोलून दानिश विवाहीत आहे, मी त्याची पत्नी आहे आणि आम्हाला दोन मुलं आहेत असं सांगितलं होतं.

तपास पथकाचे प्रमुख संदीप मितके यांनी सांगितलं?

१) टीसीएसच्या या प्रकरणात आम्ही दानिश आणि त्याचा मित्र तौसिफ यांना महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांखाली अटक केली.

२) तौसिफचा फोन तपासला असता एका हिंदू व्यक्तीचा मुस्लिम पोशाखातला फोटो आम्हाला सापडला. त्यानंतर दुसरा FIR नोंदवला आणि इतर आरोपींची नावं समोर आली.

३) आरोपी धार्मिक प्रथांबाबत वाद-संवाद करत होते आणि इस्लामची शिकवणूक कशी योग्य आहे ते ठसवून धर्मांतराचं रॅकेट चालवत होते.

४) हिंदू तरुणीला गोमांस खायला लावल्याचा आरोप झाला आहे.

५) हिंदू तरुणीला नमाज पठण करायला लावल्याचंही समोर आलं आहे.

आरोपींच्या वकिलांचं म्हणणं काय?

आरोपींच्या वकिलांनी हे आरोप फेटाळले आहेत. गंमत म्हणून काही गोष्टींवर चर्चा किंवा वाद होत असत त्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या गेल्या. लोकांनी त्यांच्या स्वेच्छेने जे निर्णय घेतले त्यासाठी माझ्या अशीलांना गुन्हेगार ठरवण्यात आलं असा युक्तिवाद आरोपीचे वकील बाबा सय्यद यांनी केला आहे. धर्मासह इतर विषयांवर चर्चा झाली म्हणजे धर्मांतरणासाठी प्रवृत्त केलं असा अर्थ होत नाही असंही सय्यद म्हणाले. बाबा सय्यद म्हणाले, जर तुम्ही एफआयआर पाहिलात, तर काही ठिकाणी एखाद्या व्यक्तीने पीडितेचं कौतुक केल्याचाही उल्लेख आहे. जसं की साडीत तू छान दिसतेस किंवा त्यांच्या कुटुंबांबद्दल वैयक्तिक चर्चा. हे लोक दररोज अनेक तास एकत्र काम करतात, त्यामुळे नातं निर्माण होणं स्वाभाविक आहे. एखाद्याचं कौतुक करणं किंवा वैयक्तिक गोष्टींबद्दल बोलणं हा गुन्हा कधीपासून झाला?

या आरोपांनंतर पोलिसांनी काय म्हटलंय?

दरम्यान यानंतर पोलिसांनी असाही दावा केला आहे की टीसीएसच्या या बीपीओमध्ये इतर महिलांनाही अशा प्रकारे त्रास दिला गेल्याचे धागेदोरे सापडले आहेत. छेडछाड आणि धार्मिक दृष्ट्या प्रभाव टाकण्याशी ही प्रकरणं संबंधित आहेत. या सगळ्या प्रकरणात २६ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत एकूण ९ FIR नोंदवण्यात आले. त्यापैकी सहा प्रकरणांमध्ये धर्मांतरणाचा मुद्दा उपस्थित होता असंही पोलिसांनी सांगितलं.

धर्मांतरण, बलात्कार प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची नावं काय?

शफी शेख (वय -३४)

आसिफ अन्सारी (वय -२२)

तौसिफ अत्तार (वय-३६)

शाहरुख कुरेशी (वय-३४)

रजा मेमन (वय-३५)

दानिश शेख (वय-३४)

अश्विनी चैनानी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी बहुतांश आरोपी टीम लीडर किंवा तशा वरिष्ठ पदावर कार्यरत होते. ज्या पीडितांना या रॅकेटमध्ये ओढण्यात आलं त्यांचं वय १८ ते २५ आहे. तर त्यांचं मासिक उत्पन्न हे १८ ते २५ हजार रुपये इतकं आहे.

चंद्रशेखरन यांचं निवेदन काय?

नाशिक पोलिसांनी समोर आलेल्या तक्रारी आणि आरोप अतिशय चिंताजनक आणि वेदनादायी आहेत. कंपनीने ही घटना गांभीर्याने घेतली आहे. आरोपी कर्मचाऱ्यांविरुद्ध आधीच कारवाई सुरू करण्यात आली असून कंपनी तपासात पूर्ण सहकार्य करत आहे. कंपनीकडे कोणत्याही प्रकारच्या जबरदस्ती किंवा गैरवर्तनाबाबत शून्य-सहिष्णुता धोरण आहे. सत्य परिस्थिती समोर आणण्यासाठी आणि जबाबदार व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे. TCSच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आरती सुब्रमण्यम या तपासाचे नेतृत्व करणार आहेत. दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध योग्य आणि कठोर कारवाई केली जाईल,” असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.