कराड : कोयना धरणाच्या निर्मितीसाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे योगदान कधीही विसरता येणार नसल्याचे सांगत, या प्रकल्पबाधितांचे प्रश्न शक्य तेवढय़ा लवकर सोडवले जातील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोयनानगर (ता. पाटण) येथे कोयना प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाचे सातबारा वितरणप्रसंगी ते बोलत होते. कोयनाप्रकल्पाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या विश्रामगृहाचे उद्घाटनही या वेळी झाले.

पवार म्हणाले, की महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाची निर्मिती येथील जनतेने त्यांच्या जमिनी, घरे दिल्यामुळे शक्य झाली. तरी या जनतेचा त्याग, संघर्ष अन् कष्ट मोठे असून, त्यांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. कोयना धरणाच्या निर्मितीमध्ये दिवंगत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचेही मोलाचे योगदान आहे. कोयना धरणाच्या निर्मितीनंतर महाराष्ट्र प्रकाशमय झाल्याचे पवार यांनी सांगितले. 

गतवर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील काही गावे बाधित झाली. त्या गावांच्या पुनर्वसनासाठी पर्यायी जागा लवकरच शोधण्यात यावी, असे निर्देश पवार यांनी दिले. पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, की कोयना धरण दरवर्षी संपूर्ण भरते. यातून २ हजार मेगावॉट वीज निर्मिती केली जाते. याबरोबर सातारा सांगली जिल्ह्यातील शेतीसाठी पाणी वापरले जाते, प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून धरणाची निर्मिती झाली आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे.

राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, की प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या. कोयनानगर परिसरात पर्यटन वाढीसाठी विविध विकासकामे होत आहेत. कोयना जलाशयात पर्यटकांसाठी नौका विहार सुरू करण्याबाबतही प्रयत्न सुरू आहेत. खासदार श्रीनिवास पाटील, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता यांनी केले. विभागीय आयुक्त सौरभ राव, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ह. वि. गुणाले, सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे आदी उपस्थित होते.