राजापूर : अल निनोच्या प्रभावामुळे यंदा अनियमित झालेल्या पावसाने पुन्हा जोर धरताच राजापूर तालुक्यातील पवित्र उन्हाळे तीर्थक्षेत्री गंगामाईचे तब्बल साडेसात महिन्यांनंतर पुन्हा एकदा आगमन झाले आहे. मुळगंगा, गोमुखासह गंगास्थानातील सर्व कुंडांमधून गंगाजल वेगाने प्रवाहित होऊ लागल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गंगास्नानासाठी भाविक आणि पर्यटकांची पावले तीर्थक्षेत्राकडे वळू लागली आहेत.
गंगामाईच्या आगमन-निर्गमनाचे गूढ आजही विज्ञानालाही उलगडता आलेले नाही. मात्र गेल्या काही वर्षांपासून गंगामाईचे नियमित आगमन आणि काही काळ वास्तव्य हा एक विलक्षण अनुभव भाविकांना लाभत आहे. गतवर्षी डिसेंबर २०२५ मध्ये गंगामाईचे निर्गमन झाले होते. त्यापूर्वीच्या वास्तव्यादरम्यान राज्यासह परराज्यातील लाखो भाविकांनी गंगास्नानाचा लाभ घेतला होता. त्यानंतर आता तब्बल साडेसात महिन्यांनंतर गंगामाईने पुन्हा एकदा या पवित्र तीर्थक्षेत्री दर्शन दिले आहे.
गंगामाईच्या आगमनानंतर मुळगंगेसह चंद्रकुंड, सूर्यकुंड, बाणकुंड, यमुनाकुंड, सरस्वतीकुंड, गोदावरी कुंड, अग्नीकुंड, भीमाकुंड आणि चंद्रभागा कुंड ही सर्व कुंड जलमय झाली आहेत. तसेच काशीकुंडातील गोमुखातूनही गंगाजल अखंड प्रवाहित होत आहे. या पवित्र जलप्रवाहामुळे संपूर्ण तीर्थक्षेत्रात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून गंगास्नानासाठी भाविकांची गर्दी वाढण्याची चिन्हे आहेत.
श्रावणात धूतपापेश्वर अभिषेकाची पर्वणी
गंगामाई आणि श्री देव धूतपापेश्वर यांचे अतूट नाते मानले जाते. व्रत-वैकल्यांचा पवित्र महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावणात, विशेषतः सोमवारी, गंगाजलाने श्री देव धूतपापेश्वरांचा अभिषेक करण्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. गंगास्नानानंतर भाविक श्री देव धूतपापेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतात. गंगेचे पवित्र जल आणि धोपेश्वर येथील मृडानी नदीच्या कोटीतीर्थातील पाणी एकत्र करून शिवपिंडीवर अभिषेक करण्याची परंपरा आजही श्रद्धेने पाळली जाते. यंदा गंगामाईचे श्रावणपूर्वी झालेले आगमन भाविकांसाठी पर्वणी ठरणार असून, येत्या श्रावण महिन्यात गंगास्नानासह धूतपापेश्वर अभिषेकाचा दुर्मीळ योग साधण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
