scorecardresearch

मोहरम यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह !; परभणीतील मुंबर गावाने सामाजिक सलोख्याचा वारसा जपला

भोंगे, हनुमान चालिसा यावरून वातावरण तापलेले असताना आणि धार्मिक रंग देत अस्मितेच्या मुद्दय़ांनी सामाजिक वातावरण ढवळून निघाले असताना जिल्ह्यात गोदाकाठी असलेल्या मुंबर या गावाने वर्षांनुवर्षे सामाजिक सलोख्याचा वारसा जपला आहे.

आसाराम लोमटे

परभणी : भोंगे, हनुमान चालिसा यावरून वातावरण तापलेले असताना आणि धार्मिक रंग देत अस्मितेच्या मुद्दय़ांनी सामाजिक वातावरण ढवळून निघाले असताना जिल्ह्यात गोदाकाठी असलेल्या मुंबर या गावाने वर्षांनुवर्षे सामाजिक सलोख्याचा वारसा जपला आहे. गावात एकही मुस्लीम कुटुंब नसताना दरवर्षी या गावात ‘मोहरम’ साजरा होतो. मोहरमच्या यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. संपूर्ण गाव त्यात सहभागी होतो. सध्या या गावात हा सप्ताह सुरू आहे.

पूर्णा तालुक्यातील मुंबर हे दीड-एक हजार लोकसंख्येचे गाव. गावात मारुती, ज्योतीबा, काळोबा ही मंदिरे आहेत. या श्रद्धास्थानांबरोबरच हाजी साहेब पीर सुद्धा गावात आहे. गावकरी सारख्याच श्रद्धेने या सर्व ठिकाणी जातात. सध्या मोहरम यात्रा सुरू आहे. त्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. दररोज गावात अन्नदान सुरू आहे.

हाजी साहेब पीर या श्रद्धास्थानी गव्हाची खीर केली जाते. मोहरमनिमित्त सवारी, डोले पार पडतात. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी सवाऱ्यांची पूजा केली जाते. श्रद्धाळू या ठिकाणी ऊद घालतात, पेढे-साखर वाटतात. हाजी साहेब पीर या ठिकाणी असलेले निवृत्ती महाराज शिंदे हे रमजानच्या महिन्यात ‘रोजा’चे उपवास करतात. संपूर्ण महिनाभर ते अनवाणी वावरतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा हा शिरस्ता आहे.

सध्या सप्ताहाच्या निमित्ताने गावात अन्यही सामाजिक उपक्रम सुरू आहेत. गोरगरीब कुटुंबातील मुलींच्या विवाह सोहळय़ापासून ते आरोग्य शिबिरापर्यंत अनेक उपक्रम पार पाडले जातात. केवळ मुंबर या गावातच नाही तर आजूबाजूच्या गावांमध्येही हाजी साहेब पिराविषयी लोकांच्या मनात आस्था आहे. गेल्या ३७ वर्षांपासून ही परंपरा सुरू असून ती श्रद्धेने जपली जात आहे, अशी प्रतिक्रिया सखाराम शिंदे यांनी दिली.

गावात एकही मुस्लीम कुटुंब वा व्यक्ती राहत नाही. तरीही मोहरमची परंपरा सुरू आहे. मोहरमच्या यात्रेनिमित्त जे अन्नदान होते त्यात हजारो लोक सहभागी होतात. शेवटच्या दिवशी सवारी व डोले यांची पूजा केली जाते. मोहरम ऑगस्ट महिन्यात येत आहे. त्या वेळी पावसाळय़ात गावात मोठा कार्यक्रम घेणे शक्य होत नाही त्यामुळे मोहरम यात्रेनिमित्त सध्या भजन-कीर्तनाचे कार्यक्रम सुरू आहेत. असे निवृत्ती महाराज शिंदे (देवकर) यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uninterrupted harinam week moharram yatra village parbhani legacy social harmony ysh

ताज्या बातम्या