केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक आणि सुटकेनंतर जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा भाग सुरु ठेवण्याचा निर्धार भाजपाने केला आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा उद्यापासून सुरु होणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवसांची ही यात्रा असणार आहे. यातील दोन दिवस राणेंची जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात असणार आहे जन आशीर्वाद यात्रेमुळे गेल्या तीन दिवसात राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. त्यामुळे बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या टप्प्याच्या यात्रेदरम्यान नारायण राणे काय बोलतात? याकडे राजकीय जाणकारांचं लक्ष लागून आहे. जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी राणेंनी लिलावती रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तपासणी करून घेतली. रुटीन चेकअप असल्याची माहिती भाजपा नेते प्रसाद लाड यांनी दिली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात उद्या असं असेल कार्यक्रमाचं नियोजन

  • सकाळी १० वाजता रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला माल्यार्पण
  • सकाळी १०.१५ वाजता कैलासवासी श्री. शामराव पेजे पुतळ्याला माल्यार्पण
  • सकाळी १०.२५ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला माल्यार्पण
  • सकाळी १०.५० वाजता विजय देसाई फॅक्टरी गोळप येथे आंबा बागायतदार, आंबा कॅनिंग काजू उत्पादक प्रतिनिधींशी चर्चा आणि सत्कार
  • सकाळी ११.३५ वाजता भाजपा कार्यालय येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व सत्कार
  • दुपारी १२,१५ वाजता विविध प्रतिनिधी मंडळांना भेटी
  • दुपारी १ वाजता लोकमान्य टिळक जन्मस्थान भेट
  • दुपारी १.१० वाजता स्वा. सावरकर पुतळा माल्यार्पण
  • दुपारी १.१५ ते दुपारी २ वाजेपर्यंत राखीव वेळ
  • दुपारी २.३० वाजता व्यंकटेश एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये पत्रकार परिषद
  • दुपारी ३.१० वाजता कुवारबाव भाजपा कार्यालय येथे सदिच्छा भेट व लाभार्थी नागरिकांची भेट
  • दुपारी ३.४५ वाजता लांजा येथे कार्यकर्त्यांना भेट व सत्कार
  • संध्याकाळी ४.२५ वाजता राजापूर येथे कार्यकर्त्यांची भेट व सत्कार

नारायण राणेंनी १९ ऑगस्टला मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली होती. या यात्रेचा समारोप सिंधुदुर्गमध्ये होणार होता. रायगडमध्ये नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली लावण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने शिवसेना-भाजपा आमने-सामने आले आणि राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. नारायण राणेंचा अटकपूर्वी जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक करून, महाडच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. या ठिकाणी सुनावणीवेळी त्यांच्या जामीनासाठी राणेंच्या वकीलाकडून जोरदार युक्तीवाद करण्याता आला. तर, पोलिसांकडून सात दिवसांसाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या सुनावणीत नारायण राणेंना जामीन मंजूर करण्यात आला होता.