दसरा मेळाव्यात योगी आदित्यनाथांविरोधात भाष्य केल्याचा भाजप जिल्हाध्यक्षांचा आरोप

यवतमाळ : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मंगळवारी राज्यामध्ये राणेंची अटक आणि रात्री उशिरा सुटका, असे राजकीय नाट्य पहायला मिळाले. या प्रकरणावरून राज्यात जागोजागी शिवसैनिक आणि भाजपा समर्थक आमने-सामने आले आहेत. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांविरोधात केलेल्या वक्त्याव्याप्रकरणी भाजप यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून यवतमाळ जिल्ह्यात पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

उमरखेड, यवतमाळ, महागाव, पुसदसहित एकूण पाच ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात येत असल्याचे भुतडा यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. ‘योगी आदित्यनाथ यांना चपलांनी मारलं पाहिजे. ते योगी आहेत त्यांनी कुठंतरी जाऊन बसावं. त्यांनी कशाला मुख्यमंत्री होऊन राजकारण करावं’, असं मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यातील भाषणामध्ये म्हटल्याचा व्हिडीओ आपण पाहिला आणि त्यानंतर तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. तसेच जिल्हाध्यक्ष या नात्याने जिल्ह्यातील इतर भाजपा कार्यकर्त्यांनाही मुख्यमंत्र्यांविरोधात पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल करण्यास सांगितले आहे, असे भुतडा म्हणाले. राणे जे बोलले त्यापेक्षा उग्र स्वरूपाची ठाकरे यांची भाषा होती. ज्या कलमांतर्गत राणेंविरोधात तक्रारी दाखल केल्या त्याच कलमांतर्गत मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रारी दाखल केल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे, असे ते म्हणाले.

फिर्याद दाखल केल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांविरोधात तत्परतेने गुन्हे दाखल केले. सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यांमध्ये आधी ज्याच्याविरोधात तक्रार आहे त्याला बोलावून जबाब नोंदवून घ्यावा. त्यानंतर अटक करणे गरजेचे आहे, असे वाटले तरच अटक केली पाहिजे, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असतानाही राणेंना अटक केली. त्याच धर्तीवर मुख्यमंत्र्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करावी, असे ते म्हणाले. राज्याला वेठीस धरण्याचे काम या प्रकरणात सरकारने केले. सत्तेत असलेल्या पक्षाने संयमाने वागले पाहिजे. सरकारला हा संयम दाखवता आला नाही. पोलिसांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात गुन्हे दाखल करतानाही तत्परता आणि पारदर्शकता दाखवावी. आमच्या तक्रारींवरून मुख्यमंत्री ठाकरे विरोधात गुन्हे दाखल केले नाही तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशाराही भुतडा यांनी दिला आहे.

 

चौकशी करून निर्णय घेऊ -पोलीस अधीक्षक

‘भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी स्वत: उमरखेड पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. चौकशीअंती कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारीत केली आहे. अन्य ठिकाणी अशा तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती अद्याप नाही. यवतमाळ शहर ठाण्यात विना स्वाक्षरीची व पत्त्याची अपूर्ण तक्रार प्राप्त झाली आहे. मात्र ती कोणी केली याची माहिती त्यावर नमूद नाही. पोलिसांना प्राप्त झालेल्या तक्रारीसंदर्भात चौकशी करून कारवाई संदर्भात निर्णय घेऊ’, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.