केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची अलिबाग पोलिसांसमोर हजेरी!

माध्यमांना दिली प्रतिक्रिया; जाणून घ्या काय म्हणाले

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासंदर्भातील आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय लघु, सुक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे सोमवारी अलिबाग येथे पोलिसांसमोर हजर झाले. ”न्यायालयाच्या आदेशानुसार आज अलिबागला आलो होतो.”, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

महाड न्यायालयाने राणे यांना जामीन देतांना ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर या दोन तारखांना अलिबाग येथील स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र आजारपणामुळे ते ३० ऑगस्टला अलिबागला हजर राहू शकले नव्हते. सोमवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास ते अलिबाग येथे दाखल झाले. पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन त्यांनी हजेरी लावली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार शाम सावंत आणि जिल्हाध्यक्ष महेश मोहीते उपस्थित होते. अर्धा तासाच्या चौकशी नंतर पोलीस अधिक्षक कार्यालयातून बाहेर पडले.

न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मी येथे आलो होते. मी कुठलाही जबाब यावेळी नोंदवला नाही. पोलिसांनी यावेळी चांगले सहकार्य केले अशी प्रतिक्रिया देखील राणे यांनी यानंतर पत्रकारांशी बोलतांना दिली. तर न्यायालयाने जामिनावर देतांना पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राणे पोलीसांसमोर चौकशीसाठी हजर झाले होते. ज्या प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित होते ती उत्तर त्यांनी दिली, त्यामुळे या प्रकरणात त्यांची चौकशी आता पूर्ण झाली असल्याचे राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी यावेळी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Union minister narayan ranes appearance before alibag police msr