scorecardresearch

“आपल्याकडील मुस्लिम सगळे हिंदू समाजातून मुस्लिम झालेत, त्यांच्याविरोधात…”, रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

राज्य सरकारच्या सूचनेनुसार परवानगी घेऊन भोंगे लावायला काही हरकत नाही, असेही रामदास आठवले म्हणाले

Union Minister Ramdas Athavale big statement

मशिदींवरील भोंग्यांवरून भाजपा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रमझान संपल्यानंतर म्हणजेच ३ मेनंतर मशिदींवरील भोंगे उतरविले नाहीत, तर मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा वाजविण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार मनसेच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली असून, ठाकरे यांच्या भूमिकेला भाजपानेही पाठिंबा दिल्याने राज्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नागपूरमध्ये बोलताना रामदास आठवलेंनी राज ठाकरेंच्या भूमिकेबाबतही भाष्य केले आहे.

“एका बाजूला भोंगे आहे तर दुसऱ्या बाजूला सोंगे आहेत. भोंग्याच्या विषयावर वाद होता कामा नये. पिढ्यान पिढ्यांपासून मशिदींवर भोंगे असतात. ते उतरण्याची मागणी करण्यापेक्षा राज ठाकरेंना मंदिरावर भोंगे लावयचे असतील तर त्यांनी लावावेत. पण धर्माधर्माध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये,” असे रामदास आठवले म्हणाले.

“राज ठाकरेंनी त्यांची भूमिका बदलेली आहे. त्यांच्या झेंड्यामध्ये विविध रंग होते. पण त्यांनी आता एकदम कठोर भूमिका घेतली आहे. या कठोर भूमिकेमुळे त्यांना काही राजकीय फायदा होणार नाही. बाळासाहेब असताना त्यांनी अशा प्रकारची मागणी केली नव्हती. त्यांनी दहशतवादी मुस्लिमांना विरोध केला होता. जे हिंदू समाजातून मुस्लिम झाले आहेत त्यांच्याविरोधात भूमिका घेणे योग्य नाही. भोंगे काढण्याचा प्रयत्न कोणीही करु नये. ज्यांना मंदिरांवर भोंगे लावायचे असतील त्यांना तो लावण्याचा अधिकार आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार परवानगी घेऊन भोंगे लावायला काही हरकत नाही,” असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

राज ठाकरेंच्या भूमिकेला आमचा विरोध

“राज ठाकरेंच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करुन बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला आव्हान देण्याचा प्रयत्न करु नये. भोंगे काढण्यासंदर्भात भाजपाची भूमिका नाही. मंदिरावर भोंगे लावण्याची त्यांची भूमिका असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका सबका साथ सबका विकास अशीच आहे. त्यामुळे भाजपाकडून अशी मागणी केली जाईल असे शक्य नाही,” असे आठवले म्हणाले.

राज ठाकरेंनी उलट सुलट बोलणे सोडायला हवं

“राज ठाकरेंना आधीपासूनच सुरक्षा आहे. मला वाटतं केंद्राने कोणतीही सुरक्षा देण्याची आवश्यकता नाही. पण कोणत्याही नेत्याच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची असते. राज ठाकरेंनी उलट सुलट बोलणे सोडायला हवं,” अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना सुरक्षा पुरवण्यावरुन दिली आहे.

सरकार पडावं असं मला वाटतं पण ते पडत नाहीये

“हे सरकार पडावं असं मला वाटतं पण ते पडत नाहीये. सरकार त्यावेळेला पडेल जेव्हा शिवसेना भाजपासोबत येईल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस भाजपासोबत येईल. सरकार पडले तर ते बनवण्याची आमची तयारी आहे. पण ते पडेल अशी शक्यता नाकारता येत नाही,” असे रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, मशिदीवरील भोग्यांचा त्रास केवळ हिंदूंनाच नाही तर सर्वानाच होतो. ते काढून टाकावेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. धर्म देशापेक्षा मोठा आहे, असे कोणी समजत असतील तर त्यांना जशास तसे उत्तर द्यावे लागेल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. त्यासाठी देशभरातील हिंदू बांधवांनी तयार राहावे, असे आवाहन त्यांनी केले. भोंग्यांचा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. लोकांनी त्याच अंगाने त्याकडे पाहावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Union minister ramdas athavale big statement on loudspeaker removal issue abn

ताज्या बातम्या