करोनाकाळातील ‘अनोखी शाळा’ ; मालेगाव परिसरात ‘घरोघरी अन् गल्लोगल्ली शिक्षण’ या उपक्रमास यश

‘शाळा बंद तरी शिक्षण सुरू’ हा हेतू बऱ्यापैकी साध्य करणारा हा उपक्रम म्हणूनच सध्या सर्वत्र प्रशंसेचा विषय ठरत आहे.

प्रल्हाद बोरसे, लोकसत्ता

मालेगाव : करोना संकटात शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. या संकट काळात ग्रामीण भागातील काही शाळांनी वेगवेगळे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले. मालेगाव शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरील माणके गावात ‘‘घरोघरी अन् गल्लोगल्ली शिक्षण’’ या संकल्पनेवर आधारित राबविलेल्या अशाच प्रकारच्या अनोख्या शैक्षणिक उपक्रमामुळे ज्ञानार्जनाचे उत्तम कार्य साधले गेले. ‘शाळा बंद तरी शिक्षण सुरू’ हा हेतू बऱ्यापैकी साध्य करणारा हा उपक्रम म्हणूनच सध्या सर्वत्र प्रशंसेचा विषय ठरत आहे.

सुमारे ८०० लोकसंख्या असलेल्या माणके गावात जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेचे पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. चारही वर्गाच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या ११२ इतकी  आहे. त्यातही बहुसंख्य मुलांचे पालक हे ऊसतोडणी मजूर आहेत. करोना संकट उद्भवल्यानंतर ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला खरा, परंतु तेथील बहुसंख्य पालकांकडे आधुनिक भ्रमणध्वनी नसल्याने बहुसंख्य विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणे शक्य होऊ शकले नाही. सध्या जी मुले दुसरीत शिकत आहेत, ती वर्षभर शाळेचे तोंड न बघताच पुढच्या वर्गात ढकलली गेली. अशा परिस्थितीत दुसरीतील बहुसंख्य विद्यार्थ्यांना साध्या अंकांचीही तोंड ओळख होऊ शकली नव्हती.

मुलांच्या होणाऱ्या या शैक्षणिक नुकसानीबद्दल गावचे उपसरपंच स्वप्निल देवरे व शाळेतील शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्यातून यंदाच्या शैक्षणिक वर्षांच्या प्रारंभी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका वैशाली भामरे यांनी शिक्षणाचे गाव ही संकल्पना मांडली. गावकऱ्यांच्या सर्वोतोपरी सहकार्याने गेल्या स्वातंत्र्य दिनापासून या उपक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. उपक्रम राबविण्यासाठी मुख्याध्यापक योगेश शेवाळे, शिक्षिका दीपाली शिंदे यांनी प्रयत्न केले. उपक्रमात भिंती बोलू लागल्या, माझे घर ही माझी शाळा, तरंगते वाचनालय (हँगिंग लायब्ररी), अंगण देते शिक्षण या बाबींचा समावेश केला गेला. त्याद्वारे प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांला घटक विषयानुसार शिक्षण देण्यावर भर देण्यात येत आहे. भिंती बोलू लागल्या या अंतर्गत गावातील किमान ५० भिंतींवर विद्यार्थ्यांसाठीचे उपयुक्त अभ्यास घटक रंगविण्यात आले. याशिवाय गावात जागोजागी अभ्यासविषयक फलक लावण्यात आले आहेत. सामाजिक अंतर पाळत विद्यार्थ्यांच्या घरी आणि शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांकरवी अभ्यासाचे धडे देण्याचेही शक्य ते प्रयत्न करण्यात आले.

माझे घर ही माझी शाळा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या घरातच शैक्षणिक वातावरण तसेच सुविधा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यानुसार संबधित विद्यार्थ्यांच्या घरी पायाभूत ज्ञानावर आधारित वेगवेगळे तक्ते, कार्ड लावण्यात आले. शिवाय आवश्यक ते शैक्षणिक साहित्यही त्यांना पुरविण्यात आले. त्यायोगे घरातील सदस्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास होऊ लागला. खेडय़ात अंगणात सडा-रांगोळी करण्याचा प्रघात असतो. ही बाब हेरून संख्या, मुळाक्षरे, मराठी व इंग्रजी शब्दांच्या वेगवेगळ्या रांगोळ्या घरांपुढे साकारणे नित्यनेमाणे सुरू केले गेले. त्यातून घरातील सदस्यांच्या मदतीने चिमुरडय़ांना अक्षर ओळख होऊ लागली. तसेच अध्ययनविषयक गोडीची परिणामता साधण्यास  मदत होत आहे. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या कलात्मक विकासालाही यामुळे एकप्रकारे चालना मिळू लागली आहे.

विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून गावातील चार प्रमुख चौकांमध्ये शाळेतर्फे तरंगते वाचनालय (हँगिंग लायब्ररी) सुरू करण्यात आले. या वाचनालयाच्या ठिकाणी वेगवेगळे कप्पे असणारी मोठी पिशवी टांगून ठेवली जाते. एका वाचनालयात अशा प्रकारे ४० ते ५० पुस्तके पिशवीच्या कप्प्यात ठेवली जातात. ही पुस्तके दर आठवडय़ाला बदलली जातात. गोष्टी, गाणी, कविता, प्रार्थना असणाऱ्या पुस्तकांचा यात समावेश असतो. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी धार्मिक आणि मोठय़ा मुलांसाठी स्पर्धा परीक्षांची पुस्तके या ठिकाणी ठेवली जातात. त्यामुळे वाचनसंस्कृती बळकट होण्यास मदत होत आहे.

करोनाकाळात मुलांच्या शिक्षणात पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याने गावकऱ्यांच्या सहकार्याने शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यात आला. आता त्याचे अत्यंत सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होण्याबरोबरच अवघ्या गावात शैक्षणिक वातावरण निर्माण होत आहे.– वैशाली भामरे, (उपक्रमशील शिक्षिका, माणके, मालेगाव.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Unique school during corona era in malegaon area zws

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या