जयंत पाटील यांच्याकडून विनापरवाना एसटीचे सारथ्य;  तीव्र प्रतिक्रिया, इस्लामपूर पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सजवलेल्या एसटी बसचे स्वागत करताना त्या चालवायला घेत शहरातून फेरफटका मारण्याची धक्कादायक कामगिरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी येथे केली आहे.

जयंत पाटील यांच्याकडून विनापरवाना एसटीचे सारथ्य;  तीव्र प्रतिक्रिया, इस्लामपूर पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन
इस्लामपूर शहरातून ऐन वर्दळीच्या रस्त्यावर एसटी बस चालवताना माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील

दिगंबर शिंदे

सांगली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सजवलेल्या एसटी बसचे स्वागत करताना त्या चालवायला घेत शहरातून फेरफटका मारण्याची धक्कादायक कामगिरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी येथे केली आहे. बसमधील प्रवासी आणि शहरातील रस्त्यावरील नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कृत्याची चित्रफीत समाजमाध्यमावरून प्रसारित होताच त्याविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. असाच प्रकार कवठेमहांकाळ येथे घडला असून येथील आगारात दाखल झालेली नवी एसटी बस चालवण्याचा मोह माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना आवरता आला नाही.

दरम्यान, या गंभीर प्रकाराविरुद्ध भाजपने पोलिसांकडे तक्रार केली असून या प्रकरणाची चौकशी करत  कारवाईचे आश्वासन दिले आहे. दुसरीकडे एसटीचे विभागीय नियंत्रकांनीदेखील या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी मुहूर्तावर अनेक आगारांमध्ये नवीन बस दाखल झाल्या. या अंतर्गतच इस्लामपूर आगारातील सजवलेल्या एसटी बसचे स्वागत आणि पूजेसाठी पाटील आले. या वेळी बसगाडय़ांची पूजा करताना त्यांनी ही बस प्रवाशांसह थेट चालवण्यास घेतली. एसटी स्थानकात चक्कर मारल्यावर ही बस घेऊन हे माजी मंत्री इस्लामपूर शहरातून दोन किलोमीटरची फेरी मारून आले. हा सर्व प्रकार शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर सुरू होता.  प्रवासी बस चालवण्यासाठी विशेष परवाना आणि प्रशिक्षणाची गरज असते. या पार्श्वभूमीवर असा परवाना नसताना  पाटील यांनी ही एसटी बस शहराच्या वर्दळीच्या भागातून चालवली. या गंभीर प्रकाराविरुद्ध भाजपने पोलिसांकडे तक्रार दाखल करत पोलीस निरीक्षकांच्या दालनातच ठिय्या मारला. शहरातील अन्य संस्थांनीही या प्रकरणी कारवाईची मागणी सुरू केली आहे.  एसटीचे विभागीय नियंत्रक सुनील भोकरे यांनीदेखील या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगारातील एसटी बस शहरात चालवण्याचा प्रकार हा गंभीर आहे. हे कृत्य बेकायदेशीर आहे. ती त्यांनी कशी चालवली, त्यांनी अशी मागणी केली का, ती चालवण्याची परवानगी त्यांना कोणी दिली अशी सर्व प्रकारे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येईल.

– सुनील भोकरे, एसटी सांगली विभाग नियंत्रक

शहरातून वर्दळीच्या रस्त्यावर अशी एसटी बस चालवणे धोकादायकच आहे. हा प्रकार नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा असून याची संपूर्ण चौकशी करत उद्या संध्याकाळपर्यंत निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. 

– शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक, इस्लामपूर

रोहित पाटील यांच्याकडूनही नियमभंग

असाच प्रकार कवठेमहांकाळ येथे घडला असून येथील आगारात दाखल झालेली नवी एसटी बस चालवण्याचा मोह माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना आवरता आला नाही. या बसच्या लोकार्पणावेळी हार, श्रीफळ वाढवताना त्यांनी बसचे सारथ्य करण्याची तयारी दर्शवली. लगोलग या बसचे सारथ्य करीत त्यांनीही या बसने कवठेमहांकाळ शहरातून फेरफटकाही मारला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Unlicensed driving st jayant patil strong reaction assurance action islampur police ysh

Next Story
रांजणगावजवळ अपघातात ५ जण मृत्युमुखी; भरधाव ट्रकची मोटारीला धडक 
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी