दिगबंर शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे अनेक आमदार सध्या अस्वस्थतेच्या फेऱ्यात अडकलेले दिसत आहेत. कोरेगावचे महेश शिंदे, सांगोल्याचे शहाजी पाटील यांच्यापाठोपाठ खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांनीही पक्षाचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आपल्या नाराजीचा केवळ पाढा वाचला नाही ,तर हे महाविकास आघाडीचे सरकार टिकवायचे असेल तर आमचेही ऐकायला हवे असा थेट इशाराही दिला. दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांमधील या वाढत्या नाराजीने महाविकास आघाडी सरकारमध्ये नेमकी कुठल्या पक्षाची चलती आहे आणि कुठल्या पक्षाच्या वाटय़ाला ‘वाटाण्याच्या अक्षता’ येत आहेत याची चर्चा वाढू लागली आहे.

 २०१९ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यावर महायुतीऐवजी शिवसेनेला सोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी नवी महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आली. या नव्या प्रयोगात शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाल्याने सरकारवर या पक्षाचा मोठा वरचष्मा राहील असे सुरुवातीला वाटत होते. मात्र या सत्तेतील अन्य सर्व महत्त्वाच्या मंत्रिपदांचा वाटा हा राष्ट्रवादीला मिळाल्याने हळूहळू त्यांचा सरकारमधील प्रभाव स्पष्ट झाला. सत्तेतील हा वाटा आणि त्यानुसार मिळणारे फायदे त्यांच्या लोकप्रतिनिधींपासून ते थेट कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचू लागले. दुसरीकडे या तुलनेत शिवसेनेचे कार्यकर्ते तर दूरच, पण लोकप्रतिनिधींपर्यंतही हे फायदे पोहोचण्यात अनेक अडथळे येत आहेत. मतदारसंघासाठी निधी नाही, अनेक विकासकामे मार्गी लागण्यातील अडथळे आणि दुसरीकडे आपल्याच मतदारसंघात विरोधी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मिळणारे सर्व प्रकारचे बळ यामुळे हे आमदार सत्ता येऊनही सध्या अस्वस्थ आहेत. पश्चिम महाराष्ट्राचे उदाहरण घेतले तर यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील शिवसेनेचे सांगोल्याचे शहाजीबापू पाटील, सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे महेश शिंदे यांनी जाहीर कार्यक्रमांमधून आपली ही नाराजी अनेकदा प्रगट केलेली आहे. यातून मोठी खळबळही उडाली आहे. आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री असूनही हे सरकार आमचे वाटत नसल्याची भावना या आमदारांनी बोलून दाखवलेली आहे. या मालिकेतच आता खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांच्या रूपाने तिसऱ्या आमदाराचे नाव जोडले गेले आहे.

खानापूर-आटपाडी या मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांनी आजवर तीन वेळा लोकप्रतिनिधित्व केलेले आहे. पक्षापेक्षा त्यांची स्वत:ची या मतदारसंघात मोठी ताकद आहे. यामुळे पक्षापेक्षाही त्यांचा गट हेच गणित इथे महत्त्वाचे ठरते. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना जरी शिवसेनेने उमेदवारी दिली असली तरी त्यांनी मिळवलेला विजय हा त्यांच्या स्वत:च्या ताकदीवरचा होता, हे उघड गुपित आहे. मात्र पक्षाला इथे विजय मिळवून दिलेला असताना आणि सत्ता मिळाल्यावरही गेल्या अडीच वर्षांत मतदारसंघातील कामांना कुठलीच भरीव अशा प्रकारची मदत मिळत नसल्याने ते गेले काही दिवस अस्वस्थ आहेत. निधी नाही, विकासकामे रखडलेली आणि सर्वात महत्त्वाचे मुख्यमंत्र्यांची भेटही नाही. या अस्वस्थतेतून त्यांनी नुकताच महाविकास आघाडीला घरचा अहेर दिला.

मंत्र्यांच्या उपस्थितीत टीकास्त्र

आटपाडी येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले, ‘सरकार येऊनदेखील कामे होत नाहीत. आम्ही मंत्रिपद, सत्ता मागत नाही. कामे करावीत, किमान आमचे ऐकून तरी घेतले जावे ही माफक अपेक्षा ठेवतोय. पण ही अपेक्षा फोल ठरत आहे. उलट सत्तेतील अन्य पक्षांकडून आमच्या विरोधात शक्ती पुरवली जात आहे. त्रास दिला जात आहे. अशाने हे सरकार टिकेल का, या जोडीनेच शिवसेना टिकेल का हाही प्रश्न आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unrest among shiv sena mla government home prey ysh
First published on: 26-05-2022 at 00:02 IST