अहिल्यानगर : जिल्ह्यात विविध भागात काल, बुधवारी रात्री झालेल्या जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पाऊस व गारपीटीने शेतीचे मोठे नुकसान केले. सहा तालुक्यातील ४१ गावातील ७ हजार ३५२ शेतकर्यांचे साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला. गारपीटीने काढणीला आलेल्या रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाने नुकसानीचा अहवाल तयार केला आहे दरम्यान आज, गुरुवारी सायंकाळी पुन्हा जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. अहिल्यानगर शहर व परिसरातही विजांचा कडकडाट, जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या.
काल राहुरी, नेवासा, राहाता, अकोले, नगर आणि पाथर्डीला पावसाचा तडाखा बसला. नगरसह राज्यभर गेल्या काही दिवसांपासून हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती निवारण विभागाकडून शेतकऱ्यांना सतर्क करण्यात आले होते. त्यामुळे काढणीला आलेले पिके वेगाने काढण्यात आली.
दरम्यान, मागील दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला. अचानक झालेल्या बदलामुळे नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी काल सायंकाळी ते रात्री दरम्यान ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाटात पाऊस झाला. मनमाड रस्त्यावर अहिल्यानगर ते राहुरी तालुक्यातील काही गावांना गारपिटीचा तडाखा बसला. यामुळे अनेक ठिकाणी रस्ते, अंगणे व शेतांमध्ये गारांचा सडा पडला. द्राक्ष, आंबा, डाळींब, टरबूज या फळपिकांसह गहू, हरभरा, चारा आदी पिकांना त्याचा फटका बसला. जोरदार वार्यामुळे पिके आडवी झाली. अनेक ठिकाणी काढणीला आलेले गहू पीक जमीनदोस्त झाले. कापून ठेवलेला गहू भिजल्याने नुकसान वाढले असून चार पिक असणारे मका पिक आडवे झाले.
काल दुपारनंतर वातावरणात बदल होवून आकाशात ढग जमा झाले आणि तासाभरात वादळी पावसाला सुरूवात झाली. यात अहिल्यानगर तालुक्यातील ५ गावातील ३३ टक्क्यांपेक्षा अधिक ९३० हेक्टरवरील १ हजार ४४५ शेतकर्यांचे, पाथर्डी तालुक्यातील २ गावातील १६० शेतकर्यांचे ४१ हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांपेक्षा अधिक, राहुरी तालुक्यातील ८ गावातील ३५५ हेक्टरवरील ७०० शेतकर्यांचे ३३ टक्क्यांच्या आत तर १ हजार ७२६ हेक्टरवरील ४ हजार ३१५ शेतकर्यांचे ३३ टक्क्यांच्या आत असे ५ हजार १५ शेतकर्यांचे २ हजार ६१ हेक्टरावरील नुकसान झालेले आहे. अकोले तालुक्यातील ६ गावात ३८ हेक्टरवरील पिकांचे १९४ शेतकर्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक आणि राहाता तालुक्यातील ३ गावातील २५ शेतकर्यांचे १६.५ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे.
कांदा, टरबूज, गहू, चारा पिकाचे नुकसान
शिंगवे, देहरे, नांदगाव परिसरात काल सायंकाळनंतर गारपीट झाली, पाऊसही झाला. कांदा, टरबूज, गहू, चारा पिकाचे मोठे नुकसान झाले. यंदा टरबुजाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली होती, परंतु पावसाने नुकसान केले. कांद्याचे शेंडेही राहिले नाहीत. आमदार काशिनाथ दाते यांनी आज पाहणी केली. तहसीलदारांना कळवल्यानंतर त्यांनी पाहणीसाठी कर्मचारी पाठवले होते. अध्याप पंचनामे झाले नाहीत. -निखिल सुदाम जाधव, शिंगवे, शेतकरी.
