अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे मेहकर तालुक्यातील मोहना खुर्द शिवारात १३, तर चिखली तालुक्यातील मंगरुळ नवघरे, देऊळगाव साकर्शी शिवारासह आदी ठिकाणी २०, अशा एकूण ३३ जनावरांचा मृत्यू झाला. 

जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका पशुपालकांना बसला आहे. मेहकर तालुक्यातील शेंदला येथील गजानन रहाटे यांच्या शेतात पारखेड येथील संदीप जाधव त्यांच्याकडे असलेल्या ३०० गुरांना घेऊन थांबले होते. त्यातील चाराटंचाईमुळे कुपोषित १३ जनावरे थंडीत कुडकुडून शेतातच मृत्युमुखी पडली. याची माहिती संदीप जाधव यांनी दिली, त्यावरून गजानन रहाटे यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डुगरेकर यांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तलाठी एस.एस.गायकवाड यांनी पंचनामा केला. या घटनेमुळे संदीप जाधव यांचे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, तर मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शी येथील विष्णू हरिभाऊ राठोड यांनी जनावरे चारण्यासाठी मंगरुळ नवघरे (ता. चिखली) येथील गोपालदास खत्री यांच्या गावालगतच्या शेतात खतावर बांधण्यासाठी एक खंडी १२० रुपयेप्रमाणे २० ते २५ खंडय़ा जनावरे आणली होती; परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे २८ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान पडलेल्या पावसाने व थंडीने १६ गायी व चार वासरांचा मृत्यू झाला. पशुवैद्यकीय अधिकारी अमडापूर व मंगरुळ नवघरे येथील तलाठय़ांनी या जनावरांचा पंचनामा करून अहवाल तहसीलदारांना दिला. यामुळे विष्णू हरी राठोड यांच्या २ गायी, संतोष सूर्यभान पवार २ गायी, जयराम पवार २ गायी, सुधाकर सुर्यभान पवार १ गाय व वासरू, अमोल उत्तम पवार यांची गाय व वासरू, सुभाष मधुकर पवार यांच्या २ गायी, गणेश जाणु पवार यांची गाय व वासरू,बाळू काळू राठोड यांची गाय व वासरू, बाळू कराडे शिराळ यांच्या ४ गायी दगावल्या आहेत.