जिल्ह्य़ात ऐन शिमगोत्सवाच्या काळात अवकाळी पावसाने तडाखा दिला असून, नागरिकांना गारव्याची झुळूक अनुभवायला मिळाली असली तरी आंबा, काजू, बागायतदार मात्र चांगलेच धास्तावले आहेत. आज दुपारपासून सर्वच तालुक्यांत पावसाच्या सरी बरसल्या.
गेल्या चार दिवसांत दिवसा तसेच रात्रीच्या वेळीही हवेतील गारवा वाढला होता. रात्री कडाक्याची थंडी सुरू झाली होती. वातावरणात अचानकच असा बदल झाल्यामुळे पावसाच्या शक्यतेचा अंदाज काही जाणकरांनी वर्तवला होता. आज दिवसभर ढगाळ वातावरणामुळे हा अंदाज खरा ठरण्याची शक्यता अधिक निर्माण झाली होती. आज सकाळपासूनच मळभ दाटून आले होते. दुपारी काळोख झाल्यामुळे पावसाची चिन्हे दाट दिसू लागली होती. त्यातच दुपारी २ वाजल्यापासून पावसाच्या हलक्या सरी पडू लागल्या. सायंकाळपर्यंत जिल्ह्य़ातील सर्वच तालुक्यात अवकाळी पावसाने आपली हजेरी लावली. रत्नागिरी शहरात, गुहागर तालुक्यातील श्रृंगारतळी येथे आज आठवडा बाजार होता. त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी होती. त्यातच पावसाने सुरुवात केल्यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांचीही तारांबळ उडाली. रत्नागिरीसह संगमेश्वर, देवरुख, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली आणि राजापूर तालुक्यालाही अवकाळी पावसाने तडाखा दिला. खेड, लांजा या तालुक्यातही सुमारे २ ते ३ तास पावसाच्या सरी कोसळल्या होत्या.
अवकाळी पावसामुळे आलेल्या हवेतील गारव्यामुळे दुपारच्या कडक उन्हातून सुटका झाल्याचा आनंद नागरिकांना होत होता. तर दुसरीकडे आंबा तसेच काजू बागायतदार मात्र चांगलेच धास्तावले आहेत. जिल्ह्य़ात या वेळी बऱ्यापैकी थंडी पडल्यामुळे उशिरा का होईना पण आंब्याला मोहर आला होता. त्यामुळे आंबा बागायतदारांमध्ये काही प्रमाणात खुशी होती. आजच्या अवकाळी पावसाने मात्र बागायतदारांची ही खुशी हिरावून घेतली आहे.
जिल्ह्य़ात सध्या शिमगोत्सव जोरात सुरू आहे. होळी आणणाऱ्या गावकऱ्यांमध्ये या पावसामुळे उत्साह वाढल्याचे दिसून येत होते. भर पावसातूनही त्यांनी होळीचा उत्सव आनंदाने साजरा केला.
संग्रहित लेख, दिनांक 1st Mar 2015 रोजी प्रकाशित
रत्नागिरी, रायगडला अवकाळी पावसाचा तडाखा
जिल्ह्य़ात ऐन शिमगोत्सवाच्या काळात अवकाळी पावसाने तडाखा दिला असून, नागरिकांना गारव्याची झुळूक अनुभवायला मिळाली असली तरी आंबा, काजू, बागायतदार मात्र चांगलेच धास्तावले आहेत.

First published on: 01-03-2015 at 01:53 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unseasonal rain in ratnagiri and raigad