​सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज हवामानात अचानक बदल होऊन अवकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळी मालवण परिसरात तर सायंकाळी सावंतवाडी शहरासह परिसरात पावसाचा शिडकावा झाला. दिवसभर कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने काहीसा दिलासा दिला असला, तरी या अचानक आलेल्या संकटामुळे व्यापारी आणि आंबा-काजू बागायतदारांची मोठी धावपळ उडाली.

​उकाड्याने हैराण, सायंकाळी ढगाळ हवामान : गेल्या काही दिवसांपासून कोकणात उष्णतेचा पारा सातत्याने वाढत आहे. आज सकाळपासूनच तीव्र उन्हाचे चटके बसत होते, ज्यामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र, सायंकाळच्या सुमारास वातावरणात अनपेक्षित बदल झाला. आकाशात काळे ढग जमा होऊन असह्य उकाडा जाणवू लागला आणि काही वेळातच पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली.

बाजारपेठेत उडाली तारांबळ

​सायं​काळी अचानक पाऊस सुरू झाल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची आडोसा शोधण्यासाठी पळापळ झाली. विशेषतः रस्त्याकडेला बसणारे छोटे व्यावसायिक आणि उघड्यावर माल ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांची मोठी फजिती झाली. अचानक आलेल्या या पावसाने काही काळ जनजीवन विस्कळीत केले. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी नागरिकांची मात्र चांगलीच धावपळ उडाली.

​आंबा-काजू पिकाला फटका बसण्याची भीती :

​या अवकाळी पावसाने कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या आंबा आणि काजू पिकावर टांगती तलवार निर्माण केली आहे. सध्या हा हंगाम ऐन जोमात असताना पाऊस पडल्याने मोहोर गळणे, फळांवर डाग पडणे किंवा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करणाऱ्या बागायतदारांसमोर या पावसामुळे आता मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. अचानक झालेल्या या हवामान बदलामुळे पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.