सातारा शहरात आज अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे शाहू स्टेडियम येथील कुस्ती मैदानाचे मोठे नुकसान झाल्याने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा स्थगित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस प्रा बाळासाहेब लांडगे यांनी दिली आहे.

मागील चार दिवसांपासून तापमानाचा चढा पारा, सकाळपासूनच जाणवणारी उन्हाची तीव्रता, दिवसभर कडक ऊन आणि उकाडा यामुळे अंगाची लाही लाही होत होत असताना आज(शुक्रवार) दुपारी सातारा शहर परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसाने एकूण किती नुकसान झाले याची माहिती सायंकाळपर्यंत मिळालेली नव्हती. परंतु या पावसाने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मात्र स्थगित कराव्या लागली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा लाईटचा मंडप कोसळला, आखाड्यातील माती वाहून गेली. मॅट भिजले, स्टेडियममध्ये पाणी साठले आहे. यामुळे स्पर्धा पुढील निर्णयापर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

PHOTOS : सातारा, कराडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावासाची जोरदार हजेरी; महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला फटाका!

याशिवाय वादळी वाऱ्यामुळे स्टेजही कोसळलं. महाराष्ट्र केसरी ठरलेले पैलवान अमोल बुचडे म्हणाले की, पावसामुळे आयपीएल स्पर्धा रद्द होत नाहीत, तर कुस्ती स्पर्धा स्थगित करण्याचे काही कारण नाही. पावसाने आणि निसर्गाने जर आम्हाला साथ दिली तर आम्ही रात्रीमध्ये उद्याच्या स्पर्धा होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. सातारा तालीम संघ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्यामध्ये यावर चर्चा सुरू आहे. याठिकाणी मॅटचे आणि मातीच्या आखाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आम्ही रात्री सर्व यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न करू. फक्त आमच्या समोर एक आव्हान आहे. पडलेले लाईटचे मनोरे ताबडतोबीने उभे करणे, स्टेडियममध्ये गाड्या येतील अशी व्यवस्था करणे. यामुळे आम्ही सर्वजण शनिवारी सकाळपर्यंत सर्व व्यवस्था पूर्ण होईल असा प्रयत्न करत आहोत आणि उद्यापासून स्पर्धा सुरळीत सुरू राहील असा आमचा प्रयत्न आहे.