अहिल्यानगरः जिल्ह्यात काल, सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने पावसाचा ९ तालुक्यातील ५२ गावातील ९४६ शेतकऱ्यांचे ४२३ हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. अकोले व संगमनेर तालुक्यातील शेतीचे अधिक नुकसान झाले आहे.
जिल्हा कृषी विभागाने हा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. या पावसात भाजीपाल्यासह कांदा, आंबा, डाळिंब, केळी, बाजरी, पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्याच्या बहुतांशी भागात काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अहिल्यानगर शहरासह तालुका, पाथर्डी, कर्जत, जामखेड, नेवासा, शेवगाव, संगमनेर व अकोले या ९ तालुक्यात जोराचा पाऊस झाला. त्यात ५२ गावे बाधित झाली.
सर्वाधिक नुकसान अकोले व संगमनेरमध्ये झाले. अकोल्यातील १८ गावातील ४२८ शेतकऱ्यांचे १५३.७५ हेक्टर क्षेत्रातील बाजरी, डाळिंब, भाजीपाल्याचे नुकसान झाले. संगमनेरमधील बारा गावातील १२३ हेक्टर क्षेत्रातील बाजरी, कांदा, टोमॅटो, लिंबू, झेंडू व निंमोणी पिकांचे नुकसान झाले. एकुण ३०३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
अहिल्यानगर तालुक्यातील २ गावातील एक हेक्टर क्षेत्रात व दोन शेतकऱ्यांचे, पाथर्डीतील नऊ गावातील ६०.९ हेक्टरमधील ८८ शेतकरी, कर्जतमधील तीन गावे ५०.३० हेक्टर क्षेत्रात ६२ शेतकरी, श्रीगोंदे तीन गावातील ३५ शेतकऱ्यांचे १३ हेक्टर क्षेत्राचे, जामखेडमध्ये एका गावातील १२ शेतकऱ्यांचे १० हेक्टर क्षेत्राचे, नेवासातील दोन गावातील १२ शेतकऱ्यांचे ७.८० हेक्टर क्षेत्र, शेवगावमधील दोन गावातील चार शेतकऱ्यांचे ३.२० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.
३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेले ७८९ शेतकऱ्यांचे क्षेत्र ३५६.२७ हेक्टर असून १५७ शेतकऱ्यांचे ३३ टक्केपेक्षा कमी म्हणजे ६६.८० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.
वीजा कोसळून ४ जण, ३२ जनावरे दगावली
जिल्ह्यात गेल्या २० दिवसात विज पडून ४ जणांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले. याशिवाय १९ मोठी जनावरे, लहान ९ जनावरे, ४ ओढकाम करणारी जनावरे अशी एकूण ३२ जनावरे दगावली. १०१ कच्च्या घरांची पडझड झाली, १४ पक्क्या घरांचे शिवाय ७ गोठ्यांचेही नुकसान झाले. वीज पडून मनुष्य दगावल्यास राज्य सरकारकडून ४ लाखांची भरपाई मिळते तर जखमींना उपचाराचा खर्च मिळतो. मोठी जनावरे दगावल्यास ३७ हजार ८००, लहान जनावर जगावल्यास ४ हजार तर गोठ्यांसाठी ४ हजार रुपयांची मदत मिळते. घरांची अंशतः पडझड झाल्यास साडेचार हजार ते साडेसहा हजार रुपयांची मदत मिळते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही माहिती उपलब्ध झाली.