अवकाळी पावसाने बागायतदार धास्तावले

सिंधुदुर्ग जिल्हय़ात अवकाळी पावसाने बागायतदार धास्तावले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हय़ात अवकाळी पावसाने बागायतदार धास्तावले आहेत. मालवण, वेंगुर्ले, वैभववाडी, कणकवली या भागांत पावसाचा शिडकाव झाला. वेंगुर्ले व मालवणमधील पावसाने बागायतदार अधिक चिंतेत आहे. आज संध्याकाळी ४ वाजता तापमान ३५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले होते.

आंबा, काजू, कोकम, जांभूळ अशा फळबागायतीचा कोकणातील हंगाम पर्यावरणीय बदलाने समतोल ढासळत आहे. त्यामुळे गेले दोन दिवस बागायतदार चिंतेत आहेत.

वैभववाडी, मालवण, कणकवली, वेंगुर्ले या भागांत पावसाने हजेरी लावली. सावंतवाडी तालुक्यातील सह्य़ाद्रीच्या पट्टय़ात चौकुळ, फणसवडे खालच्या भागांत पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी वळवीच्या पावसासारख्या तर काही ठिकाणी पावसाचा शिडकाव झाला. त्यामुळे आंबा व काजू बागायतदार हवालदिल झाले.

आंबा आणि काजू बागायतीत सध्या काही भागांत मोहर, तर काही बागायतींत फळधारणा सुरू आहे. अनेक भागांत फळे मोठी झाली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर डाग पडण्याची भीती आहे. यंदा बागायतीचे पीक मागेपुढे आहे. त्या सर्वच बागायतदारांना या अवकाळी पावसाने दणका दिला आहे.

आंबा व काजू बागायतीचा मोहर गळून पडला असून होणाऱ्या फळधारणेसदेखील पावसाने दणका दिला आहे. यंदाच्या हंगामात सुरुवातीला थंडीने हुलकावणी दिल्याने बागायतीचे पीक मागे-पुढे होते; पण अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि मे महिन्यासारखे तापमान वाढल्याने बागायतदार चिंतेत आहेत.

सिंधुदुर्गातील बागायतदार गेली काही वर्षे निसर्गाच्या प्रकोपाला सामोरे जात आहेत. यंदाच्या हंगामाच्या तोंडावरच निसर्गाने अवकृपा केली, त्यामुळे निश्चितच बागायतदार चिंतेत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Untimely rains at sawantwadi