scorecardresearch

“शरद पवार भीष्म पितामह, पण…”; यूपीए अध्यक्षपदाच्या चर्चांबद्दल संजय राऊतांचं मोठं विधान

यावेळी संजय राऊतांनी काँग्रेसकडून काही अपेक्षाही केल्या आहेत.

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा एकत्र येण्यासंबंधी चर्चा सुरु झाली आहे. भाजपाला आव्हान द्यायचं असेल तर पर्यायी आघाडी उभी करण्यासंबंधी पुन्हा एकदा दिल्लीत चर्चा सुरु झाली असून यावेळी मोठी घडामोड समोर आली आहे. विरोधकांची एकी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यातच आता शरद पवारांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) अध्यक्षपद घ्यावं यासाठी प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. त्यासंदर्भातच आता संजय राऊतांनीही भाष्य केलं आहे.


संजय राऊत म्हणतात, “काँग्रेसचं अध्यक्षपद आणि युपीएचं अध्यक्षपद या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. काँग्रेसचं अध्यक्षपद कोणाकडे जाणार हे ते कुटुंब, त्यांची वर्किंग कमिटी ठरवेल. हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. पण यूपीएच्या संदर्भात विरोधी पक्षाच्या नेतृत्वासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेऊन युपीएच्या मजबूतीसाठी पुढाकार घेतला नाही, इतर पक्षांना त्यात आणलं नाही. तर दुसरं कोणी पुढाकार घेणार असेल तर या देशातले सगळे भाजपाविरोधी प्रमुख पक्ष आणि मुख्यमंत्री त्यांचं नेतृत्व स्वीकारतील, असं चित्र मी सध्या पाहतोय.

हेही वाचा – “उद्या नाना पटोलेंच्या घरी धाड पडली तर…”; नागपुरातल्या ईडीच्या कारवाईवर संजय राऊतांची प्रतिक्रिया


राऊत पुढे म्हणाले,”काँग्रेस यासंदर्भात पुढाकार घ्यायला तयार नाही असं दिसतंय. युपीए कोणाची खासगी जहागीर नाही. आता यूपीए आहे की नाही ही शंका आहे. जर २०२४ ची तयारी करायची असेल तर यूपीए मजबूत करावी लागेल. शरद पवार या सगळ्यात आघाडीवर आहेत. ते सगळ्या विरोधी पक्षांचे आधारस्तंभ आहेत, भीष्म पितामह आहेत. पण काँग्रेसकडून मला काही प्रयत्न झालेले दिसत नाहीत. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने अधिक जबाबदारीने पुढे येऊन युपीएच्या जिर्णौद्धाराचे प्रयत्न करायला हवेत”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Upa president sharad pawar sanjay raut congress bjp vsk