नांदेड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या नियोजनासंदर्भात भाजपाने गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरात विभागीय बैठक घेतल्यानंतर या पक्षाचे स्थानिक नेते आणि लोकप्रतिनिधींनी आता ‘पुढचे’ पाऊल टाकले आहे. या निवडणुकांत मोठे यश प्राप्त करण्यासाठी भाजपाने पक्षामध्ये आता स्थिरावलेल्या खासदार अशोक चव्हाण यांना ‘फ्री हॅन्ड’ दिला असून, त्यांच्यावर प्रामुख्याने नांदेड मनपा आणि नांदेड जिल्हा परिषदेची सत्ता मिळविण्याची जबाबदारी राहणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि अन्य प्रमुख नेत्यांनी गेल्या शुक्रवारी मराठवाडा विभागाच्या राजधानीत जिल्हानिहाय बैठका घेऊन प्रत्येक जिल्ह्यातील स्थिती जाणून घेतली. नांदेड जिल्ह्यातून खासदार अशोक चव्हाण, राजेश पवार, तुषार राठोड, जीतेश अंतापूरकर, श्रीजया चव्हाण या आमदारांसह पक्षाचे निमंत्रित, आजी-माजी पदाधिकारी हजर होते. मित्रपक्षांशी युती करण्यासंदर्भातील निर्णय त्या-त्या ठिकाणची परिस्थिती पाहून स्थानिक नेत्यांनी घ्यावा, असे पक्षाकडून सांगण्यात आले. नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण आणि दोन मित्रपक्षांच्या स्थानिक नेत्यांचे ताणलेले संंबंध लक्षात घेता बहुसंख्य ठिकाणी भाजपाला स्वबळावरच लढावे लागणार असल्याचे वरील बैठकीनंतर स्पष्ट झाले.
पहिल्या टप्प्यात नगर परिषदा व नगर पंचायतींच्या निवडणुका झाल्या तर भाजपाच्या जिल्ह्यातील पाच आमदारांना आपापल्या मतदारसंघातील नगर परिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकांचे नियोजन-व्यवस्थापन सांभाळावे लागणार आहे. हदगाव, कंधार, लोहा या विधानसभा मतदारसंघांमध्ये मित्रपक्षांचे आमदार आहेत. तेथे भाजपा स्वबळावर लढणार का, ते येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. नांदेड जिल्हा परिषद आणि नांदेड-वाघाळा मनपा या दोन मुख्य संस्थांमध्ये भाजपाला आजवर अनुक्रमे अध्यक्ष व महापौरपद कधीच मिळाले नव्हते. या पार्श्वभूमीवर या दोन्ही संस्थांच्या निवडणुकांचा भार अशोक चव्हाण व त्यांच्या चमूवर टाकला जाणार आहे.
वरील संस्थांच्या निवडणुकांत भाजपासोबत युती करण्याच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी अलीकडच्या काळात केलेली वक्तव्ये पाहता खासदार चव्हाण आणि त्यांचे सूर जुळण्यासारखे चित्र तयार झालेले नाही. खासदार चव्हाण व आमदार चिखलीकर यांच्यातील राजकीय वैमनस्य वेगवेगळ्या मुद्यांवरून गहिरे होत चालले आहे. या बाबींची कल्पना भाजपा नेत्यांना देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील दोन्ही मित्रपक्षांशी युती करू नका, असा सल्ला खासदार चव्हाण यांना निकटवर्तीयांनी दिला असला तरी अद्याप तसा निर्णय अधिकृतपणे झालेला नाही.
छत्रपती संभाजीनगरातील विभागीय बैठक झाल्यानंतर खासदार चव्हाण यांनी एकाच दिवसात किनवट, माहूर आणि हदगाव या तीन तालुक्यांचा नियोजित दौरा पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या भागांच्या बैठकांचे सत्र सुरू केले आहे. आमदार राजेश पवार यांनीही शनिवारी आपल्या मतदारसंघातील दोन नगर परिषदांच्या निवडणुकांसंदर्भात बैठका घेऊन स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला.
