जनतेने सत्तेतून पायउतार केल्यानंतर स्थानिक संस्थांच्या निवडणुकीतही झिडकारण्याची मालिका सुरूच राहिल्याने अस्वस्थ झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सध्या राज्याचा दौरा सुरू केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठीची ही पूर्व तयारी असा याचा भाग असला, तरी या मेळाव्यांमधून स्वपक्षातील कार्यकर्त्यांचीच मोठय़ा प्रमाणात झाडाझडती सुरू असल्याने अजित पवारांच्या या दौऱ्याने सगळय़ांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

विधानसभेपाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समितीसह नगरपालिका निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यात मोठा पराभव झाला. या प्रत्येक पराभवानंतर राष्ट्रवादीतून भाजपामध्ये जाणाऱ्यांची संख्याही वाढू लागल्याने श्री. पवार यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह प्रदेश पातळीवरील विविध पदाधिकाऱ्यांचा फौजफाटा घेत राज्यव्यापी दौऱ्याचे आयोजन केले आहे.

सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, पिंपरी, नगर असे हे जिल्हावार राजकीय मेळाव्यांचे सत्र सुरू झाले आहे. पण या बहुसंख्य मेळाव्यांमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, दिशा आणि बळ देण्याऐवजी फटकारण्याचेच काम सध्या सुरू आहे. या सर्वच ठिकाणी पराभवाचे चिंतन करताना कार्यकर्ते, पदाधिकारी यांना व्यासपीठावरून अक्षरश: झापण्यात येत आहे. कोल्हापूरच्या मेळाव्यात तर माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनाही खडसावण्यास श्री. पवार यांनी मागेपुढे पाहिले नाही. सांगलीत आ. जयंत पाटील यांच्याबाबत अजित पवार फारसे टीकात्मक बोलले नाही मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जयंतरावांच्या ‘करामती’ भल्या-भल्यांना पराभूत करण्यास कारणीभूत ठरल्याचे स्पष्टपणे सांगितले. पक्षातील मतभेद घेऊन थेट माध्यमांकडे जाणाऱ्यांचीही याच सभेत अजित पवारांनी हजेरी घेतली. साताऱ्यात पक्ष पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करताना अजितदादांनी ‘लग्नपत्रिकेत नाव छापण्यापुरते कार्यकर्ते नकोत तर काम करणारे हवेत’ असे शालजोडीतले फटके दिले. टीकेचा हा सूर पुण्यातही कायम राहिला. पक्षविरोधी काम करणाऱ्यांचा मी बंदोबस्त करणार असल्याचा इशारा इथे त्यांनी दिला.

[jwplayer apj5cKTw]

अजित पवारांच्या या राज्यव्यापी दौऱ्यामागे विधानसभेची तयारी तसेच पक्षाला लागलेली गळती रोखण्याचा मुख्य हेतू असल्याचे बोलले जात आहे. परंतु या ‘फटकेबाजी’मुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी अवाक झाले आहेत. ही पक्ष बांधणी आहे, की सततच्या पराभवाने आलेली उद्विग्नता अशी शंकाही अनेक पदाधिकारी खासगीत बोलून दाखवत आहेत. गंमत अशी, की या पक्षबांधणी मेळाव्यात स्वपक्षातील कार्यकर्त्यांवरच सर्वाधिक टीका होत आहे. सत्ताधारी भाजपवरचे आरोप हे केवळ तोंडी लावण्यापुरतेच दिसत आहेत. राज्य शासनाचे विविध प्रश्न सोडविण्यात आलेले अपयश अधेरेखित करण्यापेक्षा पक्षातील कार्यकर्त्यांना दटावण्यासाठी जादा वेळ दिला जात आहे. या साऱ्यांतून पक्षाला ऊर्जितावस्था मिळणार, की असलेली ऊर्जाही संपणार हे येणाऱ्या काळातच कळेल.