केवळ ६४ दिवसांचे वय, तरीही बाजारात मागणी ३१ लाखाची, असा माडग्याळ जातीच्या मेंढा पाहून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाईही आटपाडी येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात अवाक झाले. शेतकरी मेळाव्यात या मेंढ्याचा मंत्र्यांच्या हस्ते हार घालून सन्मान करण्यात आला.

माणदेशी आटपाडी तालुययातील जातीवंत खिलार जनावरे आणि शेळ्या-मेंढ्याना अनेक वेळा अविश्वसनीय किंमत मिळाली आहे. बाजार समितीच्या आवारात मेंढ्यांच्या यात्रेत काही जातीवंत मेंढ्यांना एक ते दीड कोटी रुपयांची मागणी झाली आहे.

डोक्याला पोपटाच्या चोचीचा आकार असलेल्या मेंढ्याला मोठी किंमत सांगितली जाते. शेतकरी सुबराव पाटील व विलास पाटील यांनी जतन केलेल्या जातीवंत माडग्याळ वंशावळीच्या ६४ दिवसांच्या मेंढयाला ३१ लाख रुपयांची मागणी झाली. मात्र, त्याचा सौदा करण्यास नकार दिला आहे.

या मेंढ्याचा शेतकरी मेळाव्यात नगरविकास मंत्री शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. यावेळी गृहराज्यमंत्री देसाई यांच्यासह खासदार धैर्यशील माने, आमदार अनिल बाबर आदी उपस्थित होते. मंत्री शिंदे आणि आमदार बाबर यांनी या जातीबाबतची माहिती घेतली. मेंढयाचे मोल ऐकून त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. या मेंढ्याचा सांभाळ करणार्‍या शेतकर्‍यांचेही त्यांनी कौतुक केले.