मुंबई : शेतकऱ्यांकडून युरियाचा होणारा अति वापर टाळण्यासाठी युरियाची गोणी ४५ किलो ऐवजी ३० किलोंची करा. महिला, अल्पभूधारक शेतकऱ्यांना ३० किलोंची गोणी हाताळणे सोयीची होईल, असेही कृषिमंत्र्यांनी केंद्रीय खते आणि रसायन मंत्री जे. पी. नड्डा यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. कृषिमंत्र्याच्या या पत्रावर शेतकरी संघटनांनी टिकेची झोड उठवली आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी २२ एप्रिल रोजी केंद्रीय रसायने आणि खत मंत्री जे. पी. नड्डा यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, शेतकरी गोणीच्या हिशोबाने आपल्या शेतात युरियाचा वापर करतो. त्यामुळे युरियाचा अतिवापर होऊन जमीन नापीक होते. त्यामुळे युरियाचा अतिवापर टाळण्यासाठी आणि महिला आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वापराच्या दृष्टीने सोयीचे होण्यासाठी युरियाची ४५ किलोंची गोणी कमी करून ३० किलोची करावी. कमी वजनाच्या गोण्यांमुळे उपलब्ध गोण्यांच्या संख्येत ५० पट वाढ होईल. या बदलामुळे गोण्यांची संख्या सुमारे ५० टक्क्यांनी वाढेल. अनुदानातही बचत होईल.

शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक करण्याचा डाव

माती परीक्षण करून शेत जमिनीला कोणत्या खतांची, रसायनांची गरज आहे, हे समजून खतांचा अतिवापर टाळला पाहिजे. खतांच्या गोणीचे वजन कमी करून काहीही उपयोग होणार नाही. वजन कमी केले तरीही खत कंपन्या खतांचे दर कमी करणार नाहीत. अखेरीस कृषिमंत्र्यांची भूमिका शेतकऱ्यांच्या नव्हे तर खत कंपन्यांच्या फायद्याची होईल. कृषिमंत्र्यांनी खतांबाबत कोणताही निर्णय घेताना राज्यातील शेतकरी संघटनांशी चर्चा करण्याची गरज आहे, अशी मागणी किसान सभेचे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी केली आहे.

युरियाची गोणी ५० किलोवरून ४५ किलो करूनही वापर वाढला

युरियाची गोणी पूर्वी ५० किलोंची होती, ती ४५ किलो करण्यात आली. त्यावेळीही युरियाचा अति वापर टाळण्याची भूमिका होती. प्रत्यक्षात युरियाचा वापर वाढतच गेला. आताही ४५ किलोची गोणी ३० किलो करण्याचा निर्णय घेतला तरीही वापर वाढणारच आहे. युरियाचा अतिवापर टाळण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती होण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड्स डीलर्स असोसिएशनचे (माफदा) अध्यक्ष विनोद तराळ – पाटील यांनी व्यक्त केले आहे.

माफदा सोबत कृषिमंत्र्यांची आज बैठक

महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड्स डीलर्स असोसिएशनने (माफदा) खत कंपन्यांकडून होणारे लिकिंग बंद करावे. अप्रमाणित एचटीबीटी कापूस बियाणांची विक्री थांबवावी. रासायनिक खते दुकानांमध्ये पोहोच मिळावीत, आदी विविध मागण्यांसाठी सोमवारपासून बेमुदत बंद पुकारला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर माफदाचे पदाधिकारी आणि कृषिमंत्री भरणे यांची बैठक आज, मंगळवारी दुपारी मंत्रालयात होणार आहे, अशी माहिती विनोद तराळ – पाटील यांनी दिली.