मुंबई : अमेरिका – इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रामुख्याने युरिया खताची आणि खत निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूची आयात पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामात युरिया खताचा तुटवडा होऊन मोठे संकट निर्माण होण्याची भीती आहे. या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची धावधाव सुरू झाली आहे. पण, अद्याप तरी युरिया टंचाईवर कोणताही ठोस उपाय समोर आलेला नाही.

युद्धामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी, २७ मार्च रोजी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत युरिया खताच्या तुटवड्यावर सविस्तर चर्चा झाली होती. आज, सोमवारी केंद्रीय कृषिमंत्र्यांसह प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत पुन्हा युरियाच्या उपलब्धतेबाबत चर्चा झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून खत उपलब्धतेचा सातत्याने आढावा घेतला जात आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचा कृषी विभाग खडबडून जागा झाला आहे. बुधवारी युरिया आणि अन्य खतांच्या मागणी आणि उपलब्धतेबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडिया प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. बुधवारी दुपारी मंत्रालयात ही बैठक होणार आहे.

युरियासाठी आखाती देश किती महत्त्वाचे

भारत आखाती देशांवर खते, रसायने आणि खत निर्मितीसाठीच्या कच्च्या मालावर अवलंबून आहे. एकूण पुरवठ्यापैकी २० ते ३० टक्के युरिया आणि ३० टक्के डीएपी खताची आयात आखातातून होते. युरिया निर्मितीसाठ नैसर्गिक वायूची गरज असते. देशाला पुरवठा होणारा ५० टक्क्यांहून जास्त नैसर्गिक वायू आखाती देशांतून येतो. त्यासह खत निर्मितीसाठी अमोनिया, सल्फर और सल्फ्यूरिक ऑसिड सारख्या कच्च्या मालाची आयातही आखातीतून होते. युद्धामुळे खतांच्या किंमतीत आणि वाहतूक दरात वाढ झाली आहे.

देशातंर्गत युरिया उत्पादनातही घट झाली आहे. युरिया निर्मितीसाठी नैसर्गिक वायूची गरज असते. पण, घरगुती वापराला प्राधान्य दिल्यामुळे खत प्रकल्पांचा पुरवठा ६० टक्क्यांनी कमी केला आहे. त्यामुळे मार्च महिन्यात युरियाचे उत्पादन १८ लाख टन आणि स्फुरद (पी) आणि पलाश (के)खतांचे उत्पादन १० लाख झाले. गतवर्षीच्या मार्चमध्ये युरियाचे २४.७८ लाख टन तर स्फुरद (पी) आणि पलाश (के)खतांचे उत्पादन ११.९० लाख टन झाले होते.

दरवर्षी ६५० लाख टन युरियाची गरज भारताला दरवर्षी सुमारे ६०० लाख टन रासायनिक खतांची गरज भासते. २०२४-२५ या वर्षात खतांची विक्री विक्रमी ६५५.९४ लाख टनांवर पोहोचली होती. एकूण खतांमध्ये युरिया सर्वाधिक वापरले जाणारे, खत असून, गतवर्षी ३८७.७ लाख टन युरियाची विक्री झाली होती. एकूण खत वापरामध्ये युरियाचा वाटा सुमारे ५५ टक्के आहे. देशाच्या अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी युरियाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.