Devendra Fadnavis targets CJP Cockroach Janta Party: गेल्या काही दिवसांपासून CJP अर्थात कॉक्रोच जनता पार्टीतर्फे महाराष्ट्रासह देशभरातल्या सरकारी शाळांच्या परिस्थितीबाबत मुद्दे उपस्थित केले जात आहेत. सरकारी शाळांमधील परिस्थिती विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासारखी नसल्याचे अनेक व्हिडीओ सीजेपीकडून प्रसारित करण्यात आले होते. स्वत: अभिजित दिपकेंनीही महाराष्ट्रातील काही शाळांचा दौरा केल्याचं दिसून आलं. मात्र, सीजेपीबाबत आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. सीजेपी म्हणजे ‘काँग्रेस जिताओ प्रोग्रॅम’ असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या भाषणामध्ये अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलं. उपस्थित भाजपाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर परखड शब्दांत टीका केली. मात्र, त्याचवेळी दिल्लीत NEET पेपरफुटीप्रकरणी तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात सुरू झालेल्या CJP च्या आंदोलकांवर व कोअर टीमवरही त्यांनी गंभीर आरोप केले.

CJP बाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीसांनी सीजेपीच्या आडून काँग्रेसला पुनरुज्जीवन दिलं जात असल्याचा आरोप यावेळी केला. “CJP याचा अर्थ एखादी छोटी संघटना नाही. सीजेपी म्हणजे ‘काँग्रेस जिताओ प्रोग्रॅम’ आहे. यात तुम्हाला जे ४-५ तरुण समोर दिसतायत, ते फक्त मोहरे आहेत. त्यांच्या बैठकांना भारत जोडोमधल्या त्याच १८० संघटना आहेत, ज्यांनी लोकसभेत भाजपाविरोधात नरेटिव्ह केला. आता तेच पुन्हा नवीन नाव घेऊन मैदानात उतरत आहेत”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

“रामायणात कालनेमी होता. तो कधी साधूचा वेश घ्यायचा तर कधी कुणाचा. वेगवेगळ्या वेशात येऊन त्याचे राक्षसी हेतू साध्य करायचा. पण प्रभू श्रीरामांचं नाव घेतलं, तेव्हा कालनेमीही जिंकू शकला नाही. आम्ही प्रभू श्रीरामांनी दिलेल्या तत्वांनुसार राज्यकारभार चालवणारे लोक आहोत”, असं म्हणत फडणवीसांनी सीजेपीला रामायणातील कालनेमीची उपमा दिली.

चांगलं काम करणाऱ्या शाळा त्यांना दिसत नाहीत – फडणवीस

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन तिथली परिस्थिती दाखवण्याच्या मु्द्यावरही देवेंद्र फडणवीसांनी टीकास्र सोडलं. “आता ते शाळेत काय शिकवलं जातं ते बोलत नाही. आता ते मुद्द्यांवर बोलतात. कुठली शाळा चांगली आहे, कुठल्या शाळेत काय चाललंय वगैरे. जिल्हा परिषदेच्या शाळांपैकी ७०-७५ टक्के शाळा चांगल्या आहेत. पण २५ टक्के शाळा चांगल्या नाहीयेत. त्या चांगल्या करण्याचा प्रयत्न चालू आहे. पण आपण अभावाच्या अर्थव्यवस्थेत आहोत. सगळ्या गोष्टी एकदम होत नाहीत. आपण अनेक कार्यक्रम चालवतो. त्यातून त्या शाळा आपण सुधरवत असतो. आज मला सांगताना आनंद वाटतो की जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा अशा आहेत जिथे प्रवेश घेण्यासाठी रांगा लागल्या आहेत. अनेक शाळांनी सुंदर काम केलंय. पण यापैकी एकही शाळा त्यांना दिसत नाहीये”, असा मुद्दा देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला.

“ज्या शाळांमध्ये नवीन वर्गखोली बनली त्यामुळे जुनी वर्गखोली बंद करून ठेवली आहे, त्या जुन्या वर्गखोलीचा फोटो काढायचा आणि म्हणायचं शाळेतल्या वर्गखोल्या बंद पडल्या आहेत. पण काही हरकत नाही. आमचं तर मत आहे की कुणीही आम्हाला सत्य सांगितलं तर त्यावर आम्ही कारवाई करतो. पण त्यांचा हेतू तो नाहीये”, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना केला.

“उत्तरदायित्व नसलेल्या लोकांना काय विचारणार?”

दरम्यान, ज्यांना कसली अकाऊंटेबिलिटीच नाही, अशा लोकांना प्रश्न विचारू शकत नाही, असंही फडणवीस यावेळी म्हणाले. “या मुद्द्यांच्या माध्यमातून ते भाजपाचा पाऊण भरलेला ग्लासही ते दाखवणार नाहीत. ते फक्त रिकामाच ग्लास दाखवतील. हे ते लोक आहेत, ज्यांना उत्तरंच द्यायची नाहीयेत. काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, विरोधी पक्षातल्या कुणी विचारलं तर आम्ही त्यांना विचारू शकतो की आम्ही एवढ्या शाळा सुधरवल्या, तुम्ही किती सुधरवल्या ते सांगा. ते उत्तर देऊ शकत नाहीत. पण हे जे कोण उत्तरदायित्व नसलेले लोक आहेत, त्यांना हा प्रश्न विचारू शकत नाही. हा कार्यपद्धतीतला बदल आहे”, असं ते म्हणाले.