आपल्या अभिनयासोबतच आपल्या नृत्यानं मराठी रसिक-प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रख्यात अभिनेत्री उषा चव्हाण या ऐंशीच्या दशकात रुपेरी पडदा गाजवणारं हे मराठमोळं नाव आजही दिग्गजांच्या यादीत आवर्जून घेतलं जातं. पण, दिग्गज अभिनेत्री उषा चव्हाण एका जमिनीच्या प्रकरणामुळे चर्चेत आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण सध्या पुण्यातील त्यांच्या कौटुंबिक जमिनीच्या वादामुळे आणि टीडीआर हस्तांतरण प्रकरणामुळे हैराण झाल्या आहेत. राक्षसांचं राज्य आहे का असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. इन्स्टाग्रामवरच्या त्यांच्या अधिकृत अकाऊंटवर त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

उषा चव्हाण काय म्हणाल्या?

मी उषा चव्हाण बोलते आहे. तुम्हाला वाटत असेल की इतके दिवस या कुठे गायब होत्या. आज तीन महिने आणि सात दिवस होतील. मी माझा जीवन गौरव पुरस्कार हा आनंद दिघे यांच्या आश्रमात ठेवून आले आहे. त्यावेळी, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला आश्वासन दिलं होतं. कायदेशीर बाबी सांगितल्या, सगळं ऐकून घेतलं. त्यानंतर ते म्हणाले तुमचं काम मी करणार. यात काही नवीन नाही. परंतु त्यांना मला माहीत आहे की याची कल्पना नाही. पण त्यांचे लोक मला आणि माझ्या मुलाला त्रास देत आहेत. एक पत्र पाठवलं आहे मुख्यमंत्री ऑफिसमधून त्यात वाट्टेल ते लिहिलं आहे. ज्या टीडीआरसाठी मी उपोषणाला बसले होते. माझ्या विरोधातले लोक मंत्रालयात उपद्व्याप करत होते. मी ज्या करता कष्ट केले ती गोष्ट परप्रांतीयांना देऊन टाकता? माझ्या मुलाचा हक्क असताना हे करता येतं? हे करुन त्यांना काय मिळतं असा प्रश्न उषा चव्हाण यांनी उपस्थित केला.

सध्या राक्षसांचं राज्य आहे असं वाटतं-उषा चव्हाण

आमचा टीडीआर लोकांना देण्याचा अधिकार कसा काय? दोन्ही पार्टी एकत्र बसा आणि निर्णय घ्या असं म्हटलं आहे कोर्टाने. तरीही पुणे महापालिकेकडून सक्ती केली जाते. कशाला आमची हाय घेता आहात? आम्हाला वारंवार त्रास दिला जातो आहे. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. हे सगळं पाहूनच मी एकनाथ शिंदेंना भेटायला गेले होते. त्यांनी मला आश्वासन दिलं होतं. पण आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून जे पत्र आलंय त्यात परत काहीतरी उपद्व्यापच सांगितले आहेत. काहीही वाट्टेल ते लिहिलं आहे. तुम्हाला कळणारच नाही की नेमकं काय करायचं आहे. आम्ही काय करायचं आहे? आयुष्यभर आम्ही हेच करायचं का माझं वय ७९ आहे. दहीहंडीच्या दिवशी मी ऐंशी वर्षांची होईन कशाला माझी हाय घेत आहात. सध्या राक्षसांचं राज्य आहे असं वाटतं आहे. मराठी माणसाला जगवायचं नाही का? परप्रांतीयांना आमच्या कष्टाचं का देत आहात? आमची गोष्ट लोकांना द्यायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? तुम्ही तुमचं पत्र वाचा. त्यात कळेल की तुमची भाषा कशी आहे. मधे त्यांचे एक पीए आहेत त्यांचा फोन आला होता. दहा दिवसांच्या आत मिटिंग होईल सांगितलं, पण नंतर काहीच घडलं नाही.

आमच्या डोक्याला ताप झाला आहे-उषा चव्हाण

मंगेश देसाई यांनाही आम्ही संपर्क केला. डोक्याला ताप आम्हालाही कुणाला द्यायचा नाही. आमच्या हक्काच्या गोष्टी आहेत त्यामुळे आम्ही बोलतो आहोत. माझ्या चाहत्यांना समजलं पाहिजे की नेमकं काय चाललं आहे म्हणून हा व्हिडीओ मी करते आहे. आमची सर्टिफिकेट आम्हाला द्या. झोपेतून जागे व्हा जरा जे गुन्हेगार आहेत ते. ज्यांनी मला पत्र पाठवलं आहे ना ते पुन्हा वाचा. बेकायदेशीर गोष्टी असत्या तर मी पुढे गेलेच नसते. सध्या मोगलाई चालली आहे का? परप्रांतीयांच्या हातात सगळ्या गोष्टी द्यायच्या आणि मराठी माणसाला झोपवायचं. प ण असं काही मी करणार नाही असंही उषा चव्हाण यांनी म्हटलं आहे.