Usha Chavan Awards Returned news update : सोंगाड्या, पांडू हवालदार, पळवा पळवी अशा असंख्य सुपरहिट चित्रपटांमध्ये सदाबहार काम करणाऱ्या उषा चव्हाण यांनी त्यांच्या जीवनगौरव पुरस्कारासहित शासकीय पुरस्कार परत केला आहे. ठाण्यातील आनंद दिघे यांच्या आनंद आश्रम येथे त्यांनी हे पुरस्कार अर्पण केले आहेत. जमिनीच्या वादातून बिल्डर आणि पुणे पालिकेने त्यांची फसवणूक केल्याच्या आरोपातून त्यांनी असा निर्णय घेतला. याबाबत त्यांनी आज टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला.
जमिनीची वाद नेमका काय?
पुण्यातील धनकवटी सर्वे क्रमांक १३ या जमिनीबाबत उच्च न्यायालयाने निर्णय दिला असून या मालमत्तेच त्यांच्या मुलाचा म्हणजेच हृदयनाथ यांचा हिस्सा आहे. मात्र, पुणे महानगरपालिकेने चुकीच्या पद्धतीने टीडीआर मंजूर करून गोयल यांना परस्पर हिस्सा देऊन टाकला आहे, असा दावा उषा चव्हाण यांनी केला. “याबाबत चौकशीकरता माझा मुलगा गेला असता त्याला अपमानास्पद वागणूक देण्यात आली”, असंही त्यांनी सांगितलं.
आनंद आश्रम आमच्यासाठी पवित्र जागा
त्या पुढे म्हणाल्या, “मी त्याला बोलले की आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊया. कारण हे खातं त्यांच्याकडे आहे. टीडीआर आमचा चोरला असून २२ वर्षे आम्ही लढतो आहे. मी माझ्या सासूबरोबर तिथे गहू बाजरी काढली आहे. काही लोकांनी आमचा हिस्सा आम्हाला दिला. पण आम्ही खोटं बोलतोय असं म्हटलं जातंय. आम्हाला खोटं बोलायचं असतं तर आम्ही येथे या पवित्र जागी आलोच नसतो. आमची सत्याची बाजू आहे.”
“धनकवटी सर्वे नंबर १३ येथे काही नव्हतं, तिथे आम्ही शेती करत होतो. त्यानंतर तिथे बांधकाम झाले. सर्वे नंबर १३ मध्ये जागेचा डीटीआर आहे, परस्पर विकला गेला आहे. सर्व गुपित ठेवलं आहे. या लोकांनी परस्पर १०० टक्के टीडीआर देऊन टाकला आहे”, असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून त्यांची भेटही घेणार आहेत. त्या मूळच्या शिवसैनिक असून त्यांना येथे नक्की न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
