Uttam Jankar On Ajit Pawar : राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निवडणुकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का बसला. महापालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे राजकारणात पुन्हा घडामोडींना वेग आला आहे. या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. कारण मागच्या काही दिवसांत दोन्ही राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.

जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते उत्तम जानकर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.’एकत्र यायचं असेल तर सत्तेतून बाहेर पडा’, असं वक्तव्य उत्तम जानकर यांनी अजित पवारांना उद्देशून केलं आहे.

उत्तम जानकर काय म्हणाले?

महापालिका निवडणुकीनंतर आता झेडपीच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आहे. या प्रश्नावर बोलताना उत्तम जानकर म्हणाले की, “मला याबाबत माहिती नाही. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं मला वाटत नाही. कारण शरद पवार यांचा विचार वेगळा आहे आणि आता अजित पवार हे सत्तेबरोबर आहेत. त्यामुळे बिर्याणीमध्ये गुळवणी चालेल की नाही? मला माहिती नाही. अजित पवारांना कुठला तरी एक निर्णय घ्यावा लागेल. म्हणजे सत्तेतून बाहेर तरी पडावं लागेल, आता उद्या काय घडेल हे माहिती नाही. पण शरद पवार यांचा जो विचार आहे तो विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत”, असं उत्तम जानकर माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

‘…तर सत्तेतून बाहेर पडावं लागेल’

“एकत्र यायचं असेल तर सत्तेतून बाहेर पडावं लागेल आणि शरद पवार यांच्या विचाराने पुढे जावं लागेल. काही तरी धोरण असल्याशिवाय कोणताही पक्ष चालत नाही. त्यासाठी विचार असावा लागतो. मग कोणताही पक्ष असूद्या. भारतीय जनता पक्षाचाही हिंदुत्व हा विचार आहे, शिवसेनेचाही हिंदुत्व हा विचार आहे. तसं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पुरोगामी हा विचार आहे. त्यामुळे काही तरी धोरण आणि भविष्य ठरवावं लागत असतं”, असं उत्तम जानकर यांनी म्हटलं आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर मंत्री भरणेंचं मोठं वक्तव्य

जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा असतानाच कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक मोठं वक्तव्य केलं. मंत्री भरणे म्हणाले की, “वैयक्तिक माझं मत असं आहे की,मग कुठलीही आघाडी असो. फक्त आमच्या पक्षाचीच नाही तर कोणतीही आघाडी असली तरी चिन्ह हे एकच असलं पाहिजे”, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.

“जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे योग्य तो निर्णय घेतील. काय होतं की निवडणुकीत ग्रामीण भागातील अनेक लोकांचा मतदान करताना चिन्हावरून गोंधळ होतो. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याबाबतचा निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार हा अजित पवार यांचा आहे”, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं.