सांगली : भारतीय जनता पक्ष सांगली लोकसभा मतदारसंघ यांच्या वतीने मोदी @९ महाजनसंपर्क अभियान अंतर्गत उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली लोकसभा मतदारसंघातील पलूस, तासगांव कवठेमहांकाळ. सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये दि. ११ व १२जून रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती सांगली लोकसभा जनसंपर्क अभियानाचे संयोजक खा. संजयकाका पाटील यांनी दिली . खा.पाटील यांनी सांगितले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित केंद्रातील सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली. त्याअंतर्गत मोदी @९ महाजनसंपर्क अभियान सांगली लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघात उत्साहात राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री मौर्य हे सांगली मतदार संघामध्ये येत आहेत. दि. १० रोजी रात्री त्यांचा भिलवडी येथीलचितळे डेअरीच्या अतिथीगृहात मुक्काम आहे. रविवारी डेअरीची पाहणी केल्यानंतर मोटार सायकल रॅलीद्वारे कार्यकर्त्यांसह तासगांवच्या प्रसिध्द गणपती मंदीरला भेट देणार आहेत. दुपारी सानेगुरूजी नाटयगृह येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांची भेट व चर्चा करण्यात येणार आहे. सांगलीमध्ये दि. सोमवार दि. १२ रोजी स्वयंसेवक संघाची बैठक, व्यापारी संमेलन, टिळक स्मारक मंदीर येथे प्रमुख कार्यकर्ता मेळावा, सायंकाळी मिरजेत कार्यकर्ता मेळावा मौर्य यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती खा. पाटील यांनी दिली.