१५ ते १८ वयोगटातील मुलांचे आता शाळांमध्येही लसीकरण; मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय

मुलांचं शाळेत लसीकरण करताना संपूर्ण काळजी घेतली जाणार असल्याचे राजेश टोपे म्हणाले

Vaccination campaigns in schools decision of the state government after the cabinet meeting

सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर आता शाळांमध्येही लहान मुलांची लसीकरण मोहिम राबण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच मुलांच्या लसीकरणाबद्दल संभ्रम बाळगण्याचं कारण नाही असेही राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

“मंत्रिमंडळाच्या बैठकीत करोना स्थितीबद्दलचं सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. लसीकरणावर जोर दिला गेला पाहिजे, यावर बैठकीत भर देण्यात आला आहे. आजही लसीचा पहिला डोज आणि दुसरा डोज यामध्ये राज्यातील काही जिल्हे मागे पडले आहेत. त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसह आयुक्तांनी विशेष लक्ष द्यावं, अशी चर्चा बैठकीत झाली,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

“२४ जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळा पुन्हा एकदा सुरू केल्या जाणार आहेत. जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पालकमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्या सल्ल्याने कोणत्या तालुक्यातील आणि कोणत्या शाळा सुरू करायच्या हा निर्णय त्यांनी द्यावा. मात्र, बऱ्यापैकी शाळा सुरू कराव्यात असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे,” अशी माहिती टोपे यांनी दिली.

“१५ ते १८ वयोगट म्हणजे नववी, दहावी आणि अकरावीच्या वर्गातील मुलांचं शाळेत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलांचं शाळेत लसीकरण करताना संपूर्ण काळजी घेतली जावी, अशी चर्चाही बैठकीत झाली,” असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

“१५ ते १८ वयोगटातील ५० टक्के मुलांचं लसीकरण झालेलं आहे. त्याला निश्चित आता गती मिळेल. शाळा सुरू व्हाव्यात. लहान मुलांच्या शिक्षणावर तसेच मनोविकासावर कुठल्याही प्रकारचा विपरित परिणाम होणार नाही, या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला टास्क फोर्सनेही संमती दिली आहे,” असे टोपे म्हणाले.

“लसीकरणाबद्दल पालकांमध्ये संभ्रम असण्याचं कोणतंही कारण नाही. जगामध्ये सगळीकडे लहान मुलांचंही लसीकरण सुरू झालेलं आहे. आपल्याकडे सध्या १५ ते १८ वयोगटातील मुलाचंच लसीकरण केलं जात आहे. त्यामुळे लसीकरणाबद्दल संभ्रम बाळगण्याचं कारण नाही,” असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पालकांना केलं.

मुंबईत सोमवारपासून शाळा सुरु- आदित्य ठाकरे

सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर आता मुंबईतील शाळा देखील २४ जानेवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. कोविड नियमांचे पालन करत मुंबईतील शाळा उघडणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेने स्थानिक स्तरावर पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा २४ जानेवारीपासून सुरू करण्यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vaccination campaigns in schools decision of the state government after the cabinet meeting abn

Next Story
“त्या खऱ्या जिजाऊच्या लेकी…”, जितेंद्र आव्हाड यांनी केले किरण मानेंना समर्थन देणाऱ्या महिला कलाकारांचे कौतुक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी