संदीप आचार्य
दिवाळीच्या तोंडावर राज्यात जागोजागी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत असून करोनाच्या नियमांचे पालनही नागरिकांकडून होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर पहिली लस मात्रा घेतलेल्या सुमारे ७५ लाख लोकांनी मुदत उलटूनही दुसरी लस मात्रा घेतलेली नाही. यातील गंभीर बाब म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात लसीकरणाचा वेगही घसरला आहे. महाराष्ट्रात आजघडीला ९ कोटी ६२ लाख ८३ हजार ५५१ लोकांचे लसीकरण झाले असले तरी गेल्या महिन्याच्या तुलनेत दैनंदिन लसीकरणाचा वेग मंदावला आहे. गेल्या महिन्यात साधारणपणे आठ लाख ते दहा लाख दररोजचे लसीकरण होत होते. परिणामी सप्टेंबर महिन्यात राज्यात २ कोटी २८ लाख लोकांनी लस मात्रा घेतल्या होत्या तर ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत केवळ दीड कोटी नागरिकांनीच लस मात्रा घेतल्या आहेत.

राज्यात आजघडीला ७० लाख लस मात्रा उपलब्ध आहेत तर दुसरी लस मात्रा घेण्याचे बाकी असलेल्यांची संख्या ७५ लाख एवढी आहे. यात कोव्हिशिल्डची पहिली लस घेऊन दुसरी लस घेण्यासाठी पात्र असलेले ६० लाख लोक आहेत, तर १५ लाख लोकांची कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा घेणे बाकी आहे.

house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
Sanjay Raut ANI
“मविआचं जागावाटप पार पडलं, तिन्ही पक्षांमध्ये…”, बैठकीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; वंचितच्या मागणीवर म्हणाले…
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?

२६ ऑक्टोबर रोजी राज्यात ४ लाख ७४ हजार ९२८ लोकांनी लस मात्रा घेतल्या असून गेल्या महिन्यातील दैनंदिन लसीकरणाच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये कमी लसीकरण झाले आहे. राज्यात आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील ३,५८,६४,४०४ लोकांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे, तर १,१३,५७,८१८ लोकांनी दुसरी लस मात्रा घेतली आहे. ४५ वयापुढील २,६८,२९,२८४ लोकांची पहिली लस मात्रा घेऊन झाली आहे, तर १,५८,४२,३३९ लोकांची दुसरी लस मात्रा घेऊन झाली आहे.

अजूनही करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओसरलेला नसल्याचे राज्य कृती दलाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. करोनाचे प्रमाण राज्यात व मुंबईत घटल्यामुळे लसीकरणाला मिळणारा प्रतिसाद कमी झाला असून लसीकरणासाठी व्यापक मोहीम उघडण्याची गरज असल्याचे राज्य करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गेल्या महिन्यात लसीकरण वाढण्यासाठी अनेक बैठका घेऊन पाठपुरावा केल्यामुळे सप्टेंबरमध्ये सव्वादोन कोटी लसीकरण झाले होते. मात्र ऑक्टोबरमध्ये आरोग्यमंत्री टोपे यांच्यासह संपूर्ण आरोग्य विभाग हा आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये गुंतल्यामुळे राज्यात दीड कोटी लसीकरण होऊ शकल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

जुलैमध्ये राज्यात १ कोटी २१ लाख लोकांचे लसीकरण झाले. ऑगस्टमध्ये १ कोटी ४५ लाख लोकांनी लस मात्रा घेतली तर सप्टेंबर महिन्यात २ कोटी २८ लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले. मात्र ऑक्टोबरमध्ये हेच प्रमाण घसरून १ कोटी ५० लाखांवर आले. आरोग्य विभागाने व्यापक लसीकरणासाठी जवळपास सात हजाराहून अधिक शिबिरांचे आयोजन केले होते. मात्र लोकांचा लसीकरणाला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे राज्य सरकारकडून करोनाविषयक निर्बंधांमध्ये अधिकाधिक शिथिलता आणण्यात येत आहे, तर दुसरीकडे मास्क वापरणे तसेच सुरक्षित अंतरासह आवश्यक नियमांचे सातत्याने उल्लंघन होताना दिसत आहे. सार्वजनिक वाहतूक, बाजारपेठा तसेच मॉल्समध्ये मास्क वापरण्याचे निर्बंध झुगारण्याकडे लोकांचा कल दिसत असून यातून करोना रुग्ण वाढू शकतात अशी भीती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी वक्त केली आहे. अमेरिका व चीनमध्ये पुन्हा करोना रुग्णवाढ झाली असून जास्तीतजास्त लसीकरण व करोना नियमांचे पालन केले पाहिजे असे आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले. राज्यात आजपर्यंत ३ कोटी लोकांनी दोन्ही लस मात्रा घेतल्या असून देशातील कोणत्याही राज्यापेक्षा हे प्रमाण जास्त असल्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. आगामी महिन्यात पुन्हा एकदा व्यापक मोहीम उघडून जास्तीतजास्त लसीकरण केले जाईल असा विश्वास डॉ. प्रदीप व्यास यांनी व्यक्त केला आहे.