‘लोटिस्मा’ संग्रहालयातील साहित्यठेव्याला जलसमाधी

चिपळूणच्या महापुराचा फटका; प्रकल्प पुन्हा उभारण्याचा निर्धार

चिपळूणच्या महापुराचा फटका; प्रकल्प पुन्हा उभारण्याचा निर्धार

रत्नागिरी : चिपळूणच्या साहित्यिक-सांस्कृतिक वर्तुळातील अग्रगण्य लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर (लोटिस्मा) संग्रहालयातील अमूल्य साहित्यठेव्याला महापुरात जलसमाधी मिळाली. मात्र, या आघाताने खचून न जाता संग्रहालय पुन्हा उभे करण्यासाठी या प्रकल्पाचे प्रवर्तक आणि वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कंबर कसली आहे.

‘लोटिस्मा’ या लघुनामाने प्रसिद्ध असलेल्या या वाचनालयातर्फे २०१३ मध्ये मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. त्याच वेळी देशपांडे यांनी अशा स्वरूपाच्या संग्रहालय आणि संशोधन केंद्राचा संकल्प सोडला होता. त्यानंतर विविध पातळ्यांवर सतत पाठपुरावा करत गेल्या वर्षी हा प्रकल्प पूर्ण झाला. ख्यातनाम पुरातत्त्व संशोधक डॉ. गो. ब. देगलूरकर यांच्या हस्ते संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले.

या संदर्भात ‘लोकसत्ता’ला माहिती देताना देशपांडे यांनी सांगितले की, यापूर्वी चिपळुणात जुलै २००५ रोजी महापूर आला होता. त्या वेळची धोक्याची पातळी आधारभूत मानून सुरक्षित अंतरावर वाचनालयाच्या आवारात संग्रहालय साकारले. पण यंदाच्या महापुराने तो अंदाज चुकीचा ठरवल्याने येथील जुने दस्तावेज आणि वस्तूंचा मोठा ठेवा पुराच्या पाण्यात बुडाला किंवा वाहून गेला. कोकणातील लोकांचे संदर्भ असलेले  झाशीच्या राणीच्या काळापूर्वीही सुमारे शंभर वर्षे जुने (१७५०-६०) जमाखर्चाचे कागद, १८५५ साली छापलेले पुस्तक, एकेकाळी चिपळूण हे बंदर होते, असा पुरावा देणारे पत्ते असलेली पोस्ट कार्ड, व्हिक्टोरिया राणीच्या काळापासूनचे (१९ वे शतक) निरनिराळ्या संस्थानांचे बॉन्ड पेपर, दुर्मीळ हस्तलिखिते, सुमारे ५० फूट लांबीची जन्मपत्रिका इत्यादी वैविध्यपूर्ण साहित्याचा त्यामध्ये समावेश आहे.

पुरातून बचावलेल्या कपाटांमध्ये सातवाहन काळापासूनची नाणी, रोमन कुंभ, अश्मयुगीन हत्यारे शाबूत आहेत. सध्या संग्रहालयात व्यापून राहिलेल्या चिखल-पाण्यातून या वस्तू काळजीपूर्वक शोधून बाजूला काढण्याचे अवघड काम सध्या देशपांडे व त्यांचे सहकारी करत आहेत. संग्रहालयातील काचेची कपाटे, शो-केसेस नव्याने करून या साहित्याची पुन्हा सुबकपणे मांडणी करावी लागणार आहे. याशिवाय, साठवलेल्या अनेक वस्तू जागेअभावी मांडता आलेल्या नव्हत्या. संग्रहालयाच्या फेरउभारणीत त्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

पुनश्च हरी ओम

या प्रकारची संभाव्य आपत्ती विचारात घेऊन देशपांडे यांनी विमा कंपन्यांशी पूर्वीच संपर्क केला होता. पण, त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. शासकीय अनुदानासाठी सुमारे दीड वर्षांपूर्वी केलेल्या अर्जाला अजून उत्तरही मिळालेले नाही. त्यामुळे संग्रहालयाची नव्याने उभारणी करण्यासाठी अशा उपक्रमाचे मोल जाणणाऱ्या हितचिंतकांकडूनच पुन्हा निधी उभारण्याचेही आव्हान आहे. पण, दुर्दम्य आशावाद बाळगून  ‘पुनश्च हरी ओम’ म्हणत देशपांडे व त्यांचे सहकारी कामाला लागले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Valuable book in lotisma museum drown in chiplun flood zws