प्रदीप नणंदकर

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी (उदगीर) : कोणाच्या तरी चरणी साहित्य अर्पण करणारे पोटार्थी लेखक कसली मूल्ये जपणार? असा सवाल नाटककार राजकुमार तांगडे यांनी ‘लेखक आणि लोकशाही मूल्ये’ या परिसंवादात बोलताना उपस्थित केला. येथे सुरू झालेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राज्य निवडणूक आयोगातर्फे आयोजित उपरोक्त परिसंवादात तांगडे बोलत होते. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या पुढाकाराने हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. परिसंवादात देशपांडे यांच्यासह दिलीप चव्हाण, हेमांगी जोशी, हालिमाबी कुरेशी, सोनाली नवांगुळ, अतुल देऊळगावकर हे सहभागी झाले होते.  प्रा. दीपक पवार यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.

प्रशासन व्यवस्था शहरे जोडण्यात मग्न असून मने तुटत चालली तर ती कोण जोडणार? असा प्रश्न उपस्थित करून तांगडे म्हणाले, सुचले म्हणून नाही तर बोचले म्हणून लिहिण्यातून लोकशाही मूल्याची जपणूक केली जाईल. अतुल देऊळगावकर यांनी, पर्यावरण हा विषय गंभीर असून याचे गांभीर्य सरकार, जनतेला नाही. लोकशाही मूल्ये रुजविण्याचा विषय सर्वानीच गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे सांगितले.  तर श्रीकांत देशपांडे म्हणाले, निवडणूक म्हणजे लोकशाही नाही. लोकशाही मूल्ये जपणे ही निरंतर प्रक्रिया आहे. साहित्य संमेलनात या विषयावर चर्चा घडविण्यासाठीच हा परिसंवाद आयोजित झाला. दिलीप चव्हाण म्हणाले, रचनात्मक कामाचे महत्त्व कमी होऊन विध्वंसाला महत्त्व दिले जात आहे. भक्ती चळवळीने लोकशाहीचे मूल्य जपले आहे. 

धनिक, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि उद्योगपतींकडे लोकशाही झुकत चालली असून सर्वसामान्यांच्या हातून ती निसटते आहे. तिची जपणूक करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचे मत हेमांगी जोशी यांनी मांडले. तर वय,वर्ग,जात,पंथ,धर्म यातील अंतर वाढत जात असल्याने लोकशाहीचा संकोच होत असल्याची खंत हालिमाबी कुरेशी यांनी व्यक्त केली. सोनाली नवांगुळ यांनी अपंगत्व असलेली मंडळी इतरांपेक्षा सर्वार्थाने सक्षम आहेत याची जाणीव करून घेण्याची गरज व्यक्त केली.