मुंबई : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील ‘जंतरमंतर’ येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी (दि. २३) राज्यव्यापी बंदचे आवाहन केले असून बंद यशस्वी करावा, असे आवाहन वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विरोधी पक्षांना केले आहे.

बंदच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी बुधवारी विरोधी गटातील सर्व राजकीय पक्षांना पत्रे लिहिली असून बंदमध्ये सहभागी होण्याची विनंती केली आहे. माकप, भाकप, लाल निशाण या डाव्या पक्षांनी बंदला पाठिंबा दिला आहे. शिक्षक संघटना, वाहतूक संघटना, कर्मचारी संघटनांशी यांच्याशी यासंदर्भात संवाद साधला आहे. अनेक सामाजिक संघटनांनी बंदला पाठिंबा दिला आहे. आपल्या पाल्यांच्या भविष्यासाठी बंदमध्ये सहभागी व्हा, अशी आमची समस्त पालकवर्गाला हाक आहे. आज एक दिवस आपल्या पाल्यांना शाळेत पाठवू नका, असे आमचे आवाहन असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बंद यशस्वी करण्यासाठी शहराशहरांतील बाजारपेठांमध्ये जातील आणि एक दिवस दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करतील. आम्ही कुणावरही जबरदस्ती करणार नाही. हा बंद शांततेने पार पाडा अशा कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिली. युवा नेते सुजात आंबेडकर संघटनेत सक्रीय आहेत. त्यामुळे हा बंद लक्षवेधी होण्याचा अंदाज आहे.ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जंतर मंतर येथे जावून सर्वात प्रथम कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता.

वंचित बहुजन आघाडीचा मतदानाच टक्का अलीकडे घसरला असला तरी ॲड. प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग राज्यात आहे. ‘रिपाइं’मध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा गट मोठा आहे. वंचित बहुजन आघाडीने काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचे धाडस केले होते. आंबेडकरी संघटनांची ओळख आक्रमक आणि लढाऊ संघटना म्हणूनही आहे. त्यामुळे उद्याच्या बंद कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस व डाव्यांचा पाठिंबा

वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला भाकप, माकप व लाल निशाण गट या डाव्या पक्षांनी पूर्वीच पाठिंबा दिला आहे. बुधवारी सायंकाळी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला. काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यासंदर्भात घोषणा केली. त्यामुळे हा बंद यशस्वी होण्याची शक्यता आहे.