मुंबई : ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी विविध मागण्यांसाठी दिल्लीमध्ये जंतरमंतर येथे आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यातील अनेक शहरांमध्ये वंचितचे कार्यकर्ते व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याची शांततापूर्ण मार्गाने विनंती करताना दिसत होते. वंचितच्या बंदला राज्यव्यापी प्रतिसाद मिळण्याची अलिकडच्या काळातील ही पहलीच घटना आहे. वंचितने केवळ आपल्या संघटनेच्या बळावर बंद यशस्वी केला.

या बंदला वंचितचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे राजकीय प्रभावक्षेत्र असलेल्या पश्चिम विदर्भात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. भाकप, माकप, शेकाप हे डावे पक्ष, काही कामगार संघटना तसेच भारतीय बौद्ध महासभा यांचे कार्यकर्ते या बंदमध्ये मोठ्या संख्येने उतरले होते. अनेक ठिकाणी व्यापारी वर्गांनी उत्फुर्तपणे पेठा बंद ठेवून बंदमध्ये भाग घेतला. काँग्रेसने या आंदोलनास पाठिंबा दिला होता. अकोला जिल्ह्यातील मुर्तजापूर येथील काही दुकान तोडफोडीची घटना वगळता बंद राज्यभर शांततेत झाला.

नागपूरमध्ये संविधान चौक ते बर्डी मार्गावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या वंचितच्या आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेतले. या मोर्चात पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. धुळे शहरात बंद कडकडीत झाला. पुण्यात भिडे वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा वंचितकडून मोर्चा काढण्यात आला. ‘दिल्ली पोलीस मुर्दाबाद’ आणि ‘धर्मेद्र प्रधान इस्तीफा दो’ याघोषणा सर्वत्र दिल्या गेल्या. छत्रपती संभाजीनगर मध्ये पैठणगेट, औरंगापुरा येथे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. कोल्हापूर, सोलापूर, बुलढाणा, नांदेड, नंदुरबार, गडचिरोली येथेही बंदचे पडसाद उमटले. दिंडोरी, वणी, अक्कलकोट, तेल्हारा, तिवसा, खोपोली अशा छोट्या शहरांमध्ये व्यापाऱ्यांनी दुकाने बंद होती.

मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे वंचितच्या मुंबई महासचिव प्रणाली कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. माहीम, वरळी, अणुशक्तीनगर, कुलाबा, सांताक्रूझ, चेबूर, कुर्ला, अमरमहाल सिग्नल येथे वंचितच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. एरोली येथे ठाणे – बेलापूर महामार्ग आणि मुलूंड येथे सायन – पनवेल हा राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा वंचितच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. वंचितच्या हजारो कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मुंबईतील आंदोलनाचे नेतृत्व केले. सायंकाळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राजगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बंद शांततेत यशस्वी केल्याबद्दल जनतेचे आभार मानले.