नीलेश पवार, लोकसत्ता

नंदुरबार : महाविकास आघाडी सरकारवर अस्थिरतेचे सावट दाटल्याचे पाहून तब्बल ४२ कोटींच्या तोरणमाळ आंतरराष्ट्रीय शाळा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन आपल्या कार्यकाळात करता येणार नसल्याच्या धास्तीतून राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड आणि आदिवासी विकासमंत्री अ‍ॅड. के. सी. पाडवी यांनी घाईघाईत या शाळेचे आभासी पद्धतीने उद्घाटन उरकून टाकले. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार २४ जूनला या प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा होणार होता. त्या अनुषंगाने प्रशासन तयारी करीत होते. मात्र मंत्रालय स्तरावरून नाटय़मय घडामोडी घडून अवघ्या अर्ध्या तासाच्या नियोजनात दोन दिवस आधीच या शाळेचे आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. यामुळे काँग्रेसच्या मंत्र्यांनाच सरकार टिकते की नाही, याबाबत साशंकता असल्याच्या चर्चानी जोर धरला आहे.

Amir Khan Video Supporting Congress Asking for 15 lakhs
“जर कुणाच्या खात्यात १५ लाख नसतील तर..”, म्हणत आमिर खान काँग्रेसच्या प्रचाराला उतरला? Video पाहिलात का?
sangli congress, congress leaders sangli latest marathi news
सांगलीत काँग्रेसचे भवितव्य काय ? विधानसभेत फटका बसण्याची नेत्यांना भीती
Pappu Yadav’s claim on Purnea
पप्पू यादव पूर्णियातून लढण्यावर ठाम; काँग्रेस-राजदमधील जागावाटपाचा तिढा सुटेना
Due to Shiv Senas aggressiveness Congress defeat in Mahavikas Aghadi
शिवसेनेच्या आक्रमकपणामुळे काँग्रेसची फरफट

 राज्यातील शिक्षण विभागाने मोठा गाजावाजा करीत राज्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय शाळेच्या भूमिपूजनाची मुहूर्तमेढ ही मागील भाजप-शिवसेनेची सत्ता असताना रोवली गेली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते तो कार्यक्रम झाला होता. आता अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतर ४२ कोटी रुपये खर्च करून तोरणमाळसारख्या थंड हवेच्या ठिकाणी राज्यातील शिक्षण विभागाची जिल्हा परिषदेची पहिली आंतरराष्ट्रीय शाळा उभी राहिली आहे. राज्यातील या शाळेतून ग्रामीण आणि आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी वेगळा अभ्यासक्रमही तयार केला जात आहे. तोरणमाळच्या या शाळेत परिसरातील २९ छोटय़ा वाडय़ा, वस्त्यांमधील विद्यार्थ्यांसमवेत जवळपास १६०० विद्यार्थ्यांची क्षमता या आंतरराष्ट्रीय शाळेत असणार आहे. या शाळेसाठी मुंबईतील एम्पथी फाऊंडेशन यांनी सामाजिक दायित्व निधीतून मदत दिली आहे.

मार्च महिन्यात या शाळेचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर या आठवडय़ात या शाळेच्या उद्घाटनाचे नियोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यस्त असल्याने या शाळेच्या उद्घाटनासाठी २४ जून ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र शिवसेनेमधील बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. सरकारच्या भवितव्याविषयी अनिश्चितता दाटली आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या या शाळेचे उद्घाटन आपल्या कार्यकाळात होणार नाही, अशीच भीती सरकारमधील मंत्र्यांमध्ये असल्याची प्रचीती येत आहे. पूर्वनियोजित उद्घाटनाची तारीख ठरलेली असताना तत्पूर्वीच राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड आणि आदिवासी विकासमंत्री अ‍ॅड. के. सी पाडवी यांच्या उपस्थितीत या शाळेचे आभासी पद्धतीने उद्घाटन सोहळा बुधवारी १ वाजेच्या सुमारास  झाला. विशेष म्हणजे, अर्ध्या तासात या शाळेच्या उद्घाटनाचे सोपस्कार पार पाडण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या गेल्याने अधिकाऱ्यांची धावपळ झाली. जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पाचे उद्घाटन होत असताना प्रसारमाध्यमांना पूर्वसूचना दिली गेली नाही. माहिती जनसंपर्क महासंचालनालयामार्फत कुठलीही माहिती माध्यमांना मिळाली नाही. या विभागाची मुंबईतील यंत्रणाही अनभिज्ञ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या लगीनघाईमुळे संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

आभासी पद्धतीने झालेल्या सोहळय़ाला शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड, आदिवासी विकास त्री अ‍ॅड. के. सी. पाडवी, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा वळवी, उपाध्यक्ष राम रघुवंशी, शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, कृषी सभापती गणेश पराडके आदी उपस्थित होते. याची माहिती वर्षां गायकवाड यांनी स्वत: आपल्या ट्विटर हॅन्डलवरून दिली आहे.