ईडीने गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केल्यानंतर आता या प्रकरणी त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी केली. शुक्रवारी (६ ऑगस्ट) ईडीने वर्षा राऊतांची आठ तासाहून अधिक काळ चौकशी केली. यानंतर माध्यमांशी बोलताना पत्रकारांनी वर्षा राऊत यांना चौकशी दरम्यान संजय राऊतांची भेट झाली का? असा प्रश्न विचारला. यावर वर्षा राऊत यांनी राऊतांची भेट झाली नसल्याचं स्पष्ट केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्षा राऊतांनी ईडी चौकशीनंतर काहीही झालं तरी आम्ही शिवसेना पक्ष सोडणार नाही. आम्ही कायम उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहोत, असंही स्पष्ट केलं. तसेच ईडीने पुन्हा चौकशीला बोलावलं आहे का या प्रश्नावर “मला पुन्हा ईडी चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं नाही. मात्र, ईडीने पुन्हा चौकशीला बोलावलं तरी मी चौकशीसाठी पुन्हा हजर राहीन”, असं उत्तर त्यांनी दिलं.

“आम्ही संपूर्ण कुटुंब शिवसेनेसोबत आहोत”

संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत म्हणाले, “माझ्या वहिनी वर्षा राऊत यांनी ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. ईडीने त्यांचा जबाब घेऊन बाहेर सोडलं आहे. जबाबानंतर मी वहिनींशी बोललो त्यावेळी त्या एकच वाक्य म्हणाल्या, ते म्हणजे काहीही झालं तरी आम्ही शिवसेना सोडणार नाही. आम्ही संपूर्ण कुटुंब शिवसेनेसोबत आहोत.”

हेही वाचा : Photos : संजय राऊतांच्या अटकेनंतर पेढे वाटणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या वाहन चालकाने नेमकं काय म्हटलं? वाचा…

“आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जागेवर उद्धव ठाकरे”

“आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जागेवर उद्धव ठाकरे आहेत. आम्ही उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या स्थानी मानतो. त्यामुळे आम्ही कधीही शिवसेना सोडणार नाही. आमच्या कुटुंबावर कितीही अन्याय झाला, तरी आम्ही शिवसेनेसोबतच राहणार आहोत,” असंही सुनिल राऊत यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varsha raut answer question of meeting with sanjay raut during ed inquiry rno news pbs
First published on: 07-08-2022 at 11:02 IST