अलिबाग: रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या मच्छीमार बंदरांपैकी एक असलेल्या वरसोली बंदरातील गाळ साचण्याच्या गंभीर समस्येवर आता कायमस्वरूपी उपाययोजना सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून तब्बल ८० कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात येणाऱ्या ग्रोयेन्स बंधारा प्रकल्पामुळे बंदरातील नौकांची अडचण दूर होणार असून, समुद्राच्या लाटांपासून संरक्षणासाठी अवाढव्य टेट्रापॉड्सचा वापर केला जाणार आहे.

वरसोली बंदरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर गाळ साचत असल्याने विशेषतः ओहोटीच्या काळात मासेमारी नौका अडकण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. त्यामुळे मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात जाणे आणि परत बंदरात येणे मोठे धोकादायक ठरत होते. अनेकदा नौका चिखलात अडकून आर्थिक नुकसानही सहन करावे लागत होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक मच्छीमारांकडून कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी केली जात होती. अखेर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने या समस्येची दखल घेत ग्रोयेन्स बंधारा उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.

या प्रकल्पांतर्गत वरसोली आणि चाळमळा दरम्यानच्या खाडी परिसरात समुद्राच्या दिशेने समांतर जाणारे प्रत्येकी सुमारे ५०० मीटर लांबीचे दोन मजबूत बंधारे उभारले जात आहेत. या बंधाऱ्यांमुळे समुद्रातील प्रवाह नियंत्रित राहणार असून, बंदर परिसरात गाळ साचण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा दावा केला जात आहे. त्याचबरोबर दोन बंधाऱ्यांच्या मधील साचलेला गाळ उपसून तो भाग अधिक खोल करण्यात येणार असल्याने ओहोटीच्या वेळीही नौकांना सहजपणे बंदरात प्रवेश करता येणार आहे.

समुद्रातील प्रचंड लाटांचा बंधाऱ्यावर होणारा तडाखा कमी करण्यासाठी या प्रकल्पात दोन, चार आणि सहा टन वजनाचे विशाल टेट्रापॉड्स वापरण्यात येत आहेत. हे टेट्रापॉड्स बंधाऱ्याच्या बाहेरील भागावर बसवले जात असून त्यामुळे समुद्राच्या लाटा थेट बंधाऱ्यावर आदळणार नाहीत. परिणामी बंधाऱ्याची धूप, पडझड होण्याचा धोका कमी होतो.

सध्या चाळमळा बाजूच्या बंधाऱ्यावर टेट्रापॉड बसवण्याचे काम वेगाने सुरू असून, एकूण सुमारे दोन हजार टेट्रापॉड्स बसविण्यात येणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डाकडून देण्यात आली आहे. चालमळा बाजूच्या बंधाऱ्याचे जवळपास ६० टक्के काम पूर्ण झाले असून वरसोली बाजूच्याही बंधाऱ्याचे काम गतीने सुरू आहे.

मच्छीमारांना थेट लाभ

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वरसोली परिसरातील सुमारे १५० मच्छीमारांना थेट फायदा होणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील विविध भागांमधून येणाऱ्या मच्छीमारांसाठीही वरसोली बंदर सुरक्षित आश्रयस्थान ठरणार आहे. बंदरात नौका सुरक्षितरीत्या नांगरून ठेवता येणार असल्याने मासेमारी व्यवसायाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मच्छीमारांच्या मते, पावसाळ्यात तसेच ओहोटीच्या वेळी निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे अनेकदा मासेमारीवर परिणाम होत होता. आता नवीन बंधाऱ्यामुळे नौकांची सुरक्षितता वाढेल तसेच बंदरात वर्षभर सुरळीत वाहतूक शक्य होईल.

मच्छीमारांना ओहोटीदरम्यानही नौका बंदरात आणता याव्यात यासाठी दोन समांतर बंधाऱ्यांची रचना करण्यात आली आहे. या दोन बंधाऱ्यांमधील गाळ काढल्यानंतर नौकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध होईल. सध्या चाळमळा आणि वरसोली या दोन्ही बाजूंनी काम वेगाने सुरू आहे.

  • प्रवीण पाटील, उपअभियंता मेरीटाइम बोर्ड