दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर म्हणून दिशा सालियन काम करत होती. ८ जून २०२० ला मुंबईतल्या तिच्या राहत्या घरातल्या गॅलरीतून पडून तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची (ADR) नोंद केली होती. मात्र, नंतर या प्रकरणी बरेच आरोप-प्रत्यारोप झाले. या प्रकरणात आता सीबीआयने एफआयआर नोंदवला आहे; त्यात आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे नाव आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर होणारे सर्व आरोप आमदार वरुण सरदेसाई यांनी फेटाळून लावले आहेत. आदित्य ठाकरे यांच्यावर चिखलफेक करणाऱ्यांकडे जर एखादा तरी ठोस पुरावा असेल, तर त्यांनी तो आधी जनतेसमोर आणावा आणि मगच भाष्य करावे, असे थेट आव्हान सरदेसाई यांनी दिले आहे. ‘मातोश्री’वर नोटीस पाठवून केवळ प्रसिद्धीचा स्टंट केला जात असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन आणि त्यांचे वकील मानहानीची नोटीस देण्यासाठी ‘मातोश्री’वर पोहोचल्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी माझाशी बोलताना वरुण सरदेसाई यांनी भूमिका स्पष्ट केली.
“आदित्य ठाकरे त्यांना ओळखतही नव्हते”
वरुण सरदेसाई म्हणाले, “आदित्य ठाकरे हे सुशांत सिंह राजपूत किंवा दिशा सालियन यांना कधीही भेटलेले नाहीत आणि त्यांना ओळखतही नव्हते. दिशा सालियन यांचे वडील केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आणि राजकीय हेतूने प्रेरित होऊन आदित्य ठाकरेंवर बिनबुडाचे आरोप करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा दूरवरही काही संबंध नाही.”
सीबीआय किंवा अन्य कोणत्याही यंत्रणेमार्फत तपास होऊ द्या, तपासात सत्य बाहेर येईलच; राजकीय प्रतिमा मलिन करण्यासाठी हा जाणीवपूर्वक रचलेला डाव असल्याचे ते या वेळी म्हणाले.
‘मातोश्री’वर नोटीस पाठवणे हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट
केवळ माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि राजकीय चिखलफेक करण्यासाठी हा सगळा बनाव रचला जात असून, पुराव्यांशिवाय बदनामी करण्याचे हे गलिच्छ राजकारण आता थांबले पाहिजे, अशी टीका त्यांनी केली.
