वसईजवळील समुद्रात मच्छीमारांमध्ये हाणामारी

मच्छीमारांनी यलोगेट पोलीस ठाण्यात तक्रार केली असून राज्याच्या मत्स्यव्यवसाय खात्याकडेही कैफियत मांडली आहे.

पर्ससीन बोटींनी हल्ला केल्याचा स्थानिक मच्छीमारांचा आरोप

वसई : वसईजवळील समुद्रात पर्ससीन पद्धतीने मासेमारी करणारे मच्छीमार आणि पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे स्थानिक मच्छीमार यांच्यात मंगळवारी पहाटे हाणामारी झाली. दिव-दमणच्या पर्ससीन बोटींनी राज्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून अर्नाळा येथील मच्छीमारांना बेदम मारहाण करून मासेमारी जाळ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केल्याचा आरोप स्थानिक मच्छीमारांनी केला आहे. याप्रकरणी अर्नाळ्याच्या मच्छीमारांनी यलोगेट पोलीस ठाण्यात तक्रार केली असून राज्याच्या मत्स्यव्यवसाय खात्याकडेही कैफियत मांडली आहे.

अर्नाळा कोळीवाडय़ातील ‘मच्छींद्रनाथ’ ही पारंपरिक मासेमारी बोट सोमवारी किनाऱ्यापासून साधारणत: ३९ सागरी मैल अंतरावर दांडी भागात मासेमारीसाठी गेली होती. मध्यरात्रीच्या सुमारास बोटीतील खलाशांनी समुद्रात जाळी सोडली होती. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर मंगळवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास जाळी बोटीवर घेण्यास सुरुवात केली असता पर्ससीन जाळ्यांनी मासेमारी करणाऱ्या दिव-दमणच्या ‘विश्वेश्वर’ या बोटीचे नांगर मच्छींद्रनाथ बोटीच्या जाळ्यांमध्ये अडकून जाळ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. यावर मच्छींद्रनाथ बोटीच्या खलाशांनी      पर्ससीन बोटीच्या जवळ जाऊन त्यांना नांगर पाण्याबाहेर काढण्याऐवजी तसेच जाळ्यात सोडून देण्याची विनंती केली. जाळ्यातील नांगर परत केले जातील, असेही या खलाशांनी सांगितले. मात्र, पर्ससीन बोटीवरील खलाशांनी मच्छींद्रनाथ बोटीने आपल्या मासेमारीच्या कामात खोडा घातल्याचा समज करून घेतला आणि बिनतारी संदेश यंत्रणेच्या सहाय्याने आजूबाजूला मासेमारी करणाऱ्या अन्य पर्ससीन बोटींना बोलावले.

या सर्व पर्ससीने बोटींनी झुंडीने येऊन मच्छींद्रनाथ बोटीवरील खलाशांशी वाद घालायला सुरुवात केली. यामुळे प्रकरण हमरीतुमरीवर गेले. पर्ससीन बोटीतील खलाशांनी मच्छींद्रनाथ बोटीवर बाटल्या, दगडगोटे यांचा मारा सुरू केला.

या हल्लय़ात मच्छींद्रनाथ बोटीचे मालक रामदास हरक्या यांच्या पायाला तसेच डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांच्यासह अन्य तीन खलाशांनाही दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मच्छींद्रनाथ ही बोट अर्नाळा मच्छीमार विविध कार्यकारी अधिकारी संस्थेच्या अंतर्गत येत असून संस्थेने यलोगेट पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. याशिवाय मत्स्यआयुक्त आणि मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडेही कैफियत मांडून पर्ससीन बोटींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या घटनेचा स्थानिकांनी निषेध केला आहे.

पर्ससीन बोटी अनेकवेळा झुंडीने येऊन पारंपरिक मच्छीमारांशी वाद घालण्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. आम्ही याप्रकरणी तक्रार केली आहे. शासनानेही याकडे लक्ष देऊन स्थानिक मच्छीमारांचे हितरक्षण करावे. – गणेश भुरकी, अध्यक्ष, अर्नाळा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था 

ही पर्ससीन बोट दीव-दमण येथील आहे. मारहाणीचा प्रकार १५ सागरी मैलांच्या पुढे घडलेला आहे. – अजिंक्य पाटील, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, पालघर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Vasai fisherman fighting akp