वसई-विरार महापालिकेकडे क्षयरोगतज्ज्ञ डॉक्टरची कमतरता

विरार : शहरात क्षयरोग रुग्णांची संख्या वाढत असताना पालिकेकडे क्षयरोगतज्ज्ञ डॉक्टरच नसल्याचे उघड झाले आहे. क्षयरोगासाठी मंजूर झालेल्या आठ थुंकी तपासणी केंद्रे अजूनही सुरू झाली नाहीत. मागच्या वर्षी ३ हजार २५१ रुग्ण आढळले होते, तर मागील दोन महिन्यांत ३३५ रुग्ण सापडले आहेत.

वसई-विरार महानगरपालिका क्षयरोगाच्या निदानासाठी पुरवत असलेल्या आरोग्य सेवा अपुऱ्या आहेत. राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमावर पालिकेची भिस्त आहे. यात पाच युनिट तयार केले असून प्रत्येक युनिटमध्ये केवळ पाच निरीक्षक नेमण्यात आले आहेत. एकूण २५ ते ३० कर्मचारी पूर्ण शहराचा भार सांभाळत आहेत. त्यातही पालिकेकडे चेस्ट फिजिशियन नसल्याने पालिकेकडून दोन खासगी डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. यातील एक डॉक्टर विरार येथे तर दुसरे डॉक्टर वालीव येथील आरोग्य केंद्रात आठवड्यातील चार दिवस उपलब्ध असतात.

पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार सन २०२० मध्ये शहरात ३ हजार २५१ रुग्ण आढळून आले. त्यात १३७ रुग्णांचा बळी गेला. तर सन २०२१ मध्ये फेब्रुवारीपर्यंत ३३५ रुग्ण आढळून आले आहेत तर एकाचा बळी गेला आहे. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाचे अधिकारी डॉ. समीर झापुर्डे यांनी माहिती दिली की, शासनाने राबविलेल्या अभियानांतर्गत दर महिन्याला १७५ ते २०० रुग्ण सापडत आहेत. हे प्रमाण इतर शहरांच्या तुलनेत जास्त आहे.

क्षयरोगाचे रुग्ण वाढत असले तरी त्यात परप्रांतांतून येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असल्याची माहिती पालिकेच्या डॉक्टरांनी दिली. चाळी आणि झोपडपट्टी असलेल्या परिसरात क्षयरोगाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. पालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांत या रुग्णांवर मोफत इलाज उपलब्ध आहेत. शासनाकडून पालिकेला क्षयरोग निदानासाठी २१ तपासणी केंद्रे मंजूर झाली आहेत, त्यातील केवळ १३ केंद्रे सुरू आहेत. यामुळे रुग्णांना अनेक वेळा थुंकी तपासणीसाठी बाहेर खासगी तपासणी केंद्रात जावे लागत आहे. तर शासकीय केंद्रात अहवालाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

  •  मागच्या वर्षी ३ हजार २५१ रुग्ण आढळले होते, तर मागील दोन महिन्यांत ३३५ रुग्ण सापडले आहेत.
  •  क्षयरोग दूरीकरणाच्या पाच युनिटमध्ये केवळ पाच निरीक्षक नेमण्यात आले आहेत. एकूण २५ ते ३० कर्मचारी पूर्ण शहराचा भार सांभाळत आहेत.
  • क्षयरोग निदानासाठी २१ तपासणी केंद्रे मंजूर झाली आहेत, त्यातील १३ केंद्रे सुरू आहेत.

शासनाने राबविलेल्या अभियानांतर्गत दर महिन्याला १७५ ते २०० रुग्ण सापडत आहेत. हे प्रमाण इतर शहरांच्या तुलनेत जास्त आहे. – डॉ. समीर झापुर्डे, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाचे अधिकारी