scorecardresearch

“चंद्रकांत पाटलांनी मला पाहिलं आणि…”; वसंत मोरेंनी सांगितली जुनी आठवण, भाजपाच्या ऑफरबद्दल म्हणाले…

राज ठाकरेंच्या ठाण्यातल्या बहुचर्चित सभेमध्ये वसंत मोरे बोलत होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहुचर्चित सभा आज ठाण्यात होत आहे. गुढीपाडव्यादिवशी झालेल्या त्यांच्या सभेपासूनच राज ठाकरे यांची सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यातल्या या सभेसाठीही वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. राज ठाकरे या सभेत काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. दरम्यान, याच सभेत काही दिवसांपासून चर्चेत असलेले पुण्यातले पक्षाचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरेही उपस्थित आहेत.


या सभेत बोलताना त्यांनी आपल्याला चंद्रकांत पाटलांनी भाजपाची ऑफर दिली असल्याचं सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले,”ज्यावेळी मला चर्चेतला चेहरा हा पुरस्कार दिला, तेव्हा तो पुरस्कार देताना त्या ठिकाणी आमदार चंद्रकांत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे होत्या. चंद्रकांत पाटलांनी मला पाहिलं आणि मला पाहिल्यानंतर ते म्हणाले, अरे तुम्ही भाजपात या. तुम्ही नगरसेवक व्हाल. मी त्यांना एकच शब्द बोललो, दादा पंधरा वर्षं भाजपाच्याच नगरसेवकांना पाडून मी नगरसेवक होतोय. इतकं चांगलं काम आम्ही त्या भागात करतो”.

हेही वाचा – Raj Thackeray Uttar Sabha Live : “शरद पवार हे बिन चिपळ्यांचे नारद”, मनसे नेते प्रकाश महाजन यांची खोचक शब्दांत टीका!

वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबद्दल घेतलेल्या भूमिकेमुळे काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी होती. त्यापैकी वसंत मोरे हे एक. पुण्याचे पक्षाचे शहराध्यक्ष असलेले वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दलची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. त्यानंतर लगेचच घडलेल्या घटनांमुळे वसंत मोरेंवर अन्याय झाल्याची भावना अनेकांच्या मनात निर्माण झाली. मोरेंच्या भूमिकेनंतर त्यांच्याकडून शहराध्यक्ष पद काढून घेण्यात आलं आणि ते साईनाथ बाबर यांच्याकडे देण्यात आलं. राज ठाकरे यांच्याविरोधात भूमिका घेतल्याबद्दल त्यांच्याकडून हे पद काढून घेतल्याच्याही चर्चा रंगल्या. मात्र मोरे यांनी आपण ठराविक कालावधीसाठीच या पदावर असल्याने आता पायउतार झालो असल्याचं सांगितलं. तेव्हापासून वसंत मोरे यांची राज्यभर जोरदार चर्चा सुरू होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vasant more chandrakant patil raj thackeray maharashtra navnirman sena bhartiya janata party vsk

ताज्या बातम्या