vasant panchami vitthal rukmini grand wedding ritual performed In pandharpur zws 70 | Loksatta

पंढरपुरात वसंत पंचमीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह

वसंत पंचमीला श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह झाला होता, असा उल्लेख एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या रुक्मिणी स्वयंवरात केला आहे.

vitthal rukmini grand wedding ritual
श्री विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह

पंढरपूर : आजपर्यंत अनेक विवाह सोहळे झाले, होतील; पण जर देव देवतेचा विवाह असेल तर..असाच एक विवाह सोहळा पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रक्मिणीचा वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विवाह संपन्न झाला तोही शाही पद्धतीने. मंगल अक्षता,सनई चौघडे आणि वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. वसंत पंचमी ते रंगपंचमी पर्यंत देवाला शुभ्र पोशाख करून मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा आहे. त्यानुसार देवाला पांढरा शुभ्र पोशाख परिधान करण्यात आला. करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

वसंत पंचमीला श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह झाला होता, असा उल्लेख एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या रुक्मिणी स्वयंवरात केला आहे. हा विवाह सोहळा पूर्वी उत्पात समाज करीत होते. त्यानंतर आता मंदिर समिती श्री विठ्ठल मंदिरात, तर उत्पात समाज वशिष्ठ आश्रम येथे या दिवशी हा सोहळा करून परंपरा जपत आहे. हा विवाह सोहळा दिमाखदार करण्यासाठी म्हणून संपूर्ण देऊळ विविध रंगेबेरंगी फुलांनी सजविले होते. श्री विठ्ठल आणि रुक्मिणीला शुभ्र वस्त्र तर रुक्मिणी मातेस मोत्याचे दागिने,नथ,हिरवा चुडा आणि शुभ्र अलंकाराने सजविले गेले. साधारणत: सकाळी अकरा वाजता रुक्मिणीमातेच्या गर्भगृहातून श्री विठ्ठलाकडे गुलाल नेला . तिथे गुलालाची उधळण झाली. त्यानंतर विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणीमातेकडे घेऊन गेले. तिथेही गुलालाची उधळण झाली. त्यानंतर श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचे अलंकाराने सजविलेली उत्सव मूर्ती या विवाह सोहळय़ाच्या ठिकाणी आणली गेला. दोघांनाही मुंडावळय़ा बांधून आणल्या. वऱ्हाडी म्हणजेच भाविक जमा झाले. मुलीचे मामा मुलीला घेवून या असे पुकारले गेले. अंतरपाट धरला गेला आणि सुरू झाल्या मंगलाष्टका.. उपस्थितांना फुले आणि अक्षता वाटप केले जाते आणि मग आता सावध सावधान .. हे मंगलाष्टक म्हणल्यावर सर्व उपस्थित टाळय़ा वाजवून आणि टाळ-मृदंगाच्या जयघोषात आपल्या लाडक्या देवाचा विवाह सोहळा झाल्याचा आनंद साजरा केला गेला. मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महराज औसेकर ,कार्यकारी अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे , व्यवस्थापक बालाजी पुदलवाड,मंदिर समितीचे सदस्य यांच्यासह भाविक या विवाह सोहळय़ास मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

वास्तविक पाहता शिशिर ऋतू म्हणजे थंडी संपून वसंत ऋतू म्हणजे उन्हाळा सुरू होतो.  सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. वसंत ऋतूच्या आगमनाने सर्व सृष्टी फुलून जाते. सर्वत्र चैतन्याचे वातावरण तयार होते. आजचा दिवस रती आणि कामदेवाच्या पूजेचा असल्याचे मानले जाते. वसंत ऋतूच्या आगमनाने सर्व सृष्टीमध्ये चैतन्य आल्याचेच हे प्रतीक आहे. या ऋतूमध्ये पांढरे वस्त्र परिधान केले तर उन्हाची तीव्रता कमी होते. म्हणजेच विज्ञानाची जोड पूर्वी पासून होती. असे असले तरी वारकरी सांप्रदायात अनेक परंपरा आजही जपल्या जात आहेत.

विठ्ठलाची रंगपंचमी

वसंतपंचमीपासून ते रंगपंचमीपर्यंत विठ्ठलास पांढरा शुभ्र वेश परिधान करण्यात येत असतो. या काळात दररोज गुलालाची उधळण भगवंताच्या अंगावर केली जाते. वसंतपंचमी पासून ते रंगपंचमी पर्यंत म्हणजे एक महिना विठ्ठलाची रंगपंचमी सुरू राहणार. या रंगपंचमी उत्सवाचा शुभारंभ वसंतपचंमीच्या निमित्ताने झाला. सावळा विठूराया आणि रुक्मिणीमाता पांढऱ्या शुभ्र वेशात दिसणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 04:48 IST
Next Story
वीज महागाईचा झटका? सरासरी २५ टक्के दरवाढीचा महावितरणचा आयोगाकडे प्रस्ताव