scorecardresearch

 ‘वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट’ ची  मराठवाडय़ात उभारणी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यावर या केंद्राच्या उभारणीस गती आली.

Sharad-Pawar22

शरद पवार यांच्याकडून शनिवारी आढावा

लक्ष्मण राऊत, लोकसत्ता

जालना : राज्यातील ऊस उत्पादक आणि साखर उद्योग त्याचप्रमाणे उसावर प्रक्रिया करताना त्यामधून तयार होणाऱ्या अन्य घटकांच्या संदर्भात मार्गदर्शन करणारी महत्त्वाची संस्था म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट अर्थात ‘व्हीएसआय’ची ओळख आहे. साडेचार दशकांपूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेचे पुढे वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट असे नामकरण झाले. पुणे परिसरात ३८५ एकर जागेवर विस्तारलेल्या या संस्थेचे प्रमुख आधारस्तंभ आहेत राज्यातील साखर उद्योग आणि सहकारी साखर कारखाने.

शेतकऱ्यांना ऊस लागवडीसंदर्भात मार्गदर्शन करणे त्याचप्रमाणे ऊस पिकाच्या संदर्भात संशोधन करून उत्पादकांना नवनवीन संशोधित ऊस बेणे उपलब्ध करवून देण्याचे काम ‘व्हीएसआय’च्या माध्यमातून करण्यात येते. या संस्थेचे मराठवाडा विभागात केंद्र असावे, अशी जालना जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि समर्थ सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कै. अंकुशराव टोपे यांची इच्छा होती. ‘व्हीएसआय’च्या संचालकपदी असताना त्यांनी या संदर्भात मागणी केली होती आणि मराठवाडा केंद्राचा प्रस्ताव तयार करण्यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु त्यांच्या हयातीत या केंद्राचे काम सुरू झाले नाही. कै. अंकुशराव टोपे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त जालना जिल्ह्यातील समर्थ सहकारी साखर कारखान्यावर आयोजित कार्यक्रमात ‘व्हीएसआय’चे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठवाडय़ात केंद्र स्थापना करण्याची घोषणा केली होती.

जालना जिल्ह्यात १२० एकरपेक्षा अधिक जागेवर हे केंद्र उभारण्यात येत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यावर या केंद्राच्या उभारणीस गती आली. जिल्ह्यातील पाथरवाला आणि महाकाळा गावाच्या हद्दीतील जमिनीवर उभारण्यात येणारे हे केंद्र कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यापासून पाच-सात किलोमीटर अंतरावर आहे. या केंद्राच्या उभारणीचा आराखडा तयार झालेला असून त्यानुसार काम सुरू झालेले आहे. बांधबंदिस्ती तसेच अंतर्गत रस्त्यांचे काम सुरू आहे. मागील दोन वर्षांपासून उसाची लागवड करून नवीन संशोधित बेणे शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत आहे. मराठवाडा विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या केंद्राची पाहणी यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे. येत्या शनिवारी (१६ एप्रिल) ‘वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट’चे अध्यक्ष शरद पवार या कामाचा आढावा घेण्यासाठी भेट देणार आहेत. जिल्ह्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक आणि वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटचे संचालक राजेश टोपे या वेळी उपस्थित राहणार आहेत.

मराठवाडय़ात खासगी आणि सहकारी मिळून एकूण ५८ साखर कारखाने आहेत. त्यापैकी ७५ टक्के कारखाने चालू गळीत हंगामात सुरू आहेत. चांगला पाऊस त्याचप्रमाणे जायकवाडी आणि अन्य जलाशयांतील पाण्याच्या उपलब्धतेमुळे मराठवाडय़ात गेल्या काही वर्षांत हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे कारखान्यांच्या गाळप क्षमतेपेक्षा अधिक ऊस उभा असल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होत आहे. जालना जिल्ह्यातील समर्थ आणि साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात मागील हंगामात अतिरिक्त उसाचा प्रश्न होता आणि तो चालू हंगामातही आहे. सध्याचा ऊस लागवडीकडील शेतकऱ्यांचा कल पाहता पुढील हंगामातही अतिरिक्त उसाचा प्रश्न राहणार आहे. त्यामुळे या अनुषंगाने साखर कारखान्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याच्या संदर्भात ‘व्हीएसआय’चे महत्त्व अधिक अधोरेखित झालेले आहे.  ऊस लागवड वाढली

जायकवाडी जलाशयाच्या लाभक्षेत्रातील सिंचनक्षेत्र जवळपास दोन लाख ७७ हजार हेक्टर आहे. त्यापैकी अहमदनगर जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टर क्षेत्र वगळले तर उर्वरित सिंचनक्षेत्र मराठवाडय़ातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड आणि नांदेड जिल्ह्यातील आहे. पैठण डावा आणि उजवा कालवा त्याचप्रमाणे माजलगाव उजव्या कालव्याच्या माध्यमातून या क्षेत्रासाठी सिंचन होत आहे. जायकवाडी जलाशयच नव्हे तर मराठवाडय़ातील निम्न दुधना तसेच अन्य प्रकल्पांतील पाण्याच्या उपलब्धतेमुळे उसाची लागवड वाढली आहे. अलीकडेच मंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना जिल्ह्यात राज्य साखर कारखाना संघ, साखर आयुक्तालय, सहकार विभाग, खासगी साखर कारखाना संघटना यांचे प्रतिनिधी तसेच मराठवाडय़ातील साखर कारखान्यांच्या संचालकांच्या बैठकीत अतिरिक्त उसाच्या संदर्भात चर्चा झाली. या सर्व पार्श्वभूमीवर व्हीएसआयचे अध्यक्ष मराठवाडा केंद्राच्या उभारणीचा आढावा घेण्यासाठी येत्या शनिवारी (१६ एप्रिल) येत आहेत. या निमित्ताने समर्थवरील प्रतिदिनी ६० हजार लिटर्स इथेनॉल निर्मितीच्या प्रकल्पाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vasantdada sugar institute build in marathwada sharad pawar zws

ताज्या बातम्या