हिंगोली: जिल्ह्यातील वसमत येथे तरुणांना जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करून बदनामीची भीती दाखवत लाखो रुपयांची खंडणी उकळणारी टोळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी तीन स्वतंत्र गुन्ह्यांत १३ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून बहुतेकांना अटक करण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
वसमत शहरात ‘गे ट्रॅप’च्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करून खंडणी उकळणाऱ्या टोळीचा अजब प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणांना मोबाईल फोनवरील संदेशाद्वारे संपर्क साधून विश्वासात घेतले जात असत. त्यानंतर त्यांना भाड्याच्या खोलीत नेऊन अश्लील चाळे करण्यास प्रवृत्त केले जाई. आधीच लावलेल्या स्पाय कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण केले जात होते.
यानंतर संबंधित तरुणांना व त्यांच्या कुटुंबीयांना व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपयांची मागणी केली जात होती. काही प्रकरणांत मारहाण व जिवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. एका प्रकरणात तर पीडिताच्या वडिलांकडे थेट १५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.
या प्रकरणी ६ जानेवारी व १५ मार्च रोजी मिळालेल्या तक्रारींवरून पोलिसांनी तीन गुन्हे दाखल केले आहेत. विशाल डोलारकर, नगनाथ खराटे, शुभम हारबळे, वैभव हारबळे, गजानन बोखारे, अमोल गिहे यांच्यासह इतर आरोपींचा यात समावेश आहे. तसेच ऋषिकेश कदम, चंद्रकांत खराटे, नागोराव हरबळे, यज्ञेश स्वामी आदींवरही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करताना आरोपींकडून मोबाईल, व्हिडिओ साहित्य व घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या टोळीने आणखी किती जणांची फसवणूक केली याचा तपास सुरू असून, अशा प्रकारचा अनुभव आलेल्यांनी पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. हिंगोली जिल्ह्यात गे-ट्रॅपसारखा प्रकार अलिकडच्या काळात प्रथमच समोर आला असून, यापूर्वी गे-ट्रॅप आदी शब्दांविषयीही सर्वसामान्य माणूसही अनभिज्ञ होता.
